श्रीनगर :  जम्मू-काश्मीरमधल्या नौशेरा सेक्टरमध्ये भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तान वायुदलाच्या एफ-१६ या विमानाला पाडण्यात भारतीय सेनेला यश आलंय. पाकिस्तान हद्दीतल्या लाम व्हॅली क्षेत्रात हे विमान पडल्याचं वृत्त एएनआयनं दिलंय. हे विमान खाली कोसळत असताना एक पॅराशूटही दिसलं. या विमानाचा वैमानिक मात्र अद्याप बेपत्ता आहे. त्याची परिस्थितीबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही... या वैमानिकाचा शोध सुरू आहे



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


दुपारी १२.०० वाजता


पाकिस्तानची विमानं भारतीय हद्दीत शिरल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. नौशेरा सेक्टरमध्ये  पाकिस्तानच्या तीन विमानांनी भारतीय हद्दीत शिरण्याचा प्रयत्न केला. भारतीय वायुसेनेकडून अद्याप या बातमीला अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. परंतु, मिळालेल्या माहितीनुसार, छंगड आणि लान भागात तीन पाकिस्तान जेटनं हवाई हद्दीचं उल्लंघन केलंय. पाकिस्तानच्या हालचाली लक्षात येताच भारतीय विमानांनी पाकिस्तानच्या विमानांना पिटाळून लावलं. माघारी फिरताना पाकिस्तानच्या विमानांनी भारतीय सैन्यावर बॉम्ब फेकले. परंतु, या घटनेत कुठल्याही प्रकारची हानी झालेली नाही. 



दुपारी ११.३० वाजता


पाकिस्तानच्या तीन विमानांनी भारताची हद्द ओलांडल्याची बातमी वृत्तसंस्था 'पीटीआय'नं दिलीय. राजौरी परिसरात पाकिस्तानकडून हवाई हद्दीचं उल्लंघन करण्यात आलंय. बुधवारी रात्रीपासून नौशेरा सेक्टरमध्ये सीमेपलिकडून गोळीबारही सुरू होता. त्यामुळे भारत-पाक सीमारेषेवरील तणाव आणखी वाढण्याची चित्र पाहायला मिळत आहेत. सीमेवर पाकिस्तानी विमानं दिसताच क्षणी पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


लेह, जम्मू, श्रीनगर आणि पठाणकोट विमानतळांना दक्षतेचा आणि सावधानतेचा इशारा देण्यात आलाय. उल्लेखनीय म्हणजे, यामुळे प्रवासी विमानांची उड्डाणं तात्पुरती थांबवण्यात आली आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, जम्मू आणि श्रीनगर विमानतळासाठी उड्डाण घेतलेल्या काही विमानांनी उड्डाण घेतलं होतं, परंतु तत्काळ त्यांना माघारी फिरण्याचे आदेश देण्यात आलेत. दिल्लीहून जम्मू-काश्मीरकडे निघालेल्या इंडिगो आणि गो एअरच्या विमानांना दिल्ली विमानतळावरच थांबण्याचे आदेश देण्यात आलेत.



उल्लेखनीय म्हणजे, मंगळवारी पहाटे भारताकडून पाकिस्तानवर एअरस्ट्राईक करण्यात आला. 'मिराज २०००' या लढाऊ विमानांच्या सहाय्यानं १००० किलो स्फोटकांचा वापर करून 'जैश ए मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या तळाला भारतीय वायुसेनेनं निशाणा बनवलं. परदेश सचिव विजय गोखले यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतानं केलेल्या या हल्ल्यात 'जैश'चा म्होरक्या मसूद अजहरचा मेव्हणा आणि जैश ए मोहम्मदचा टॉप लीडर मौलाना युसूफ अजहर हादेखील ठार झालाय. जम्मू-काश्मीरच्या पुलमवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर पाकिस्तान समर्थित 'जैश ए मोहम्मद'कडून दहशतवादी हल्ले करण्यात आले होते... या आत्मघातकी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. त्याला प्रत्यूत्तर म्हणून भारताकडून दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानवर कारवाई करण्यात आली.  या हल्ल्यात बालाकोट, चकोटी आणि मुजफ्फराबाद येथील दहशतवादी तळ नष्ट करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.