सर्वात मोठी बातमी| पाकिस्तानात इम्रान खान सरकारची विकेट
पाकिस्तानमधील इम्रान खान सरकार कोसळलं, अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने 174 मतं
कराची : पाकिस्तानात इम्रान खान सरकार क्लिन बोल्ड झालं. मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेला पाकिस्तानी संसदेतला अविश्वासाचा ड्रामा संपला आणि इम्रान खान सरकार कोसळलं.
मिळालेल्या माहितीनुसार 342 सदस्यांच्या पाकिस्तानी संसदेत 174 मतं अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने पडली आणि इम्रान सरकार कोसळलं. आता पाकिस्तानात पुन्हा एकदा नवाझ शरीफ यांच्या पाकिस्तानी मुस्लिम लीगचं सरकार येणार आहे.
इम्रान खान सरकार कोसळल्यावर आता नवाझ शरीफ यांचे धाकटे भाऊ शाहबाज शरीफ हे पंतप्रधानपदी विराजमान होणार असल्याची माहिती मिळाली आहे. पीएमएल शरीफ गटाच्या उपाध्यक्ष आणि नवाझ शरीफ यांच्या कन्या मरियम शरीफ यांनी आधीच शाहबाझ शरीफ यांची पंतप्रधानपदासाठी घोषणा केली होती.
एकीकडे सत्ताबदल होत असताना पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादच्या रस्त्यावर लष्करी रणगाडे उतरवल्याची माहिती समोर येत आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ लंडनहून मायदेशी माघारी येण्याची शक्यता आहे.
शाहबाज शरीफ हे उद्याच पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. भावाच्या शपथविधीला स्वतः नवाझ शरीफ उपस्थित राहतील अशी शक्यता आहे. सध्या नवाझ हे लंडनमध्ये आश्रय घेऊन राहात आहेत.