Pakistan Gas Crisis : गेल्या काही दिवसांपासून आपल्या शेजारील देश पाकिस्तान मोठ्या आर्थिक संकटाला तोंड देतोय. चीनच्या कर्जाचं ओझं, राजकीय अस्थिरता, वाढती महागाई यामुळे पाकिस्तानमध्ये मोठं आर्थिक संकट (Pakistan financial crisis) निर्माण झालंय. काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानातील लाहोरमध्ये पेट्रोल पंपावरील इंधन संपल्याचे वृत्त आले होते. अर्थतज्ज्ञांकडूनही पाकिस्तानला इशारा देण्यात आला होता. अशातच या महागाईचा फटका सर्वसामान्यांनाही मोठ्या प्रमाणात बसलाय. याचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर फिरतोय. काही लोक मोठे मोठे फुगे घेऊन जाताना या व्हिडीओमध्ये जाताना दिसत आहेत. पण हे फुगे नसून घरगुती गॅसने भरलेल्या पिशव्या असल्याचे सत्य समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसलाय. आर्थिक संकटामुळे आणि एलपीजी सिलिंडरच्या (LPG Gas) कमतरेमुळे लोक अशा प्रकारे जीव धोक्यात घालून गॅस घरी घेऊन जात आहेत. मात्र प्लास्टिक पिशव्यांमधून अशाप्रकारे एलपीजी गॅस घेऊन जाणे धोक्याचे ठरु शकतं.


हातात बॉम्ब घेऊन गाठतायत घर 


पाकिस्तानी पत्रकाराने यासंदर्भातील व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. "लोकांच्या घरांमध्ये नैसर्गिक वायूचा पुरवठा होत नसल्यामुळे करक येथील नागरिक प्लास्टिकच्या पिशव्यांमधून गॅस घेऊन जात आहेत. प्रत्यक्षात ते हातात बॉम्ब घेऊन जात आहेत. करकमध्ये तेल आणि वायूचे मोठे साठे आहेत. पण करक येथील लोकांना 2007 पासून गॅस कनेक्शन मिळालेले नाही," असे या ट्विटमध्ये म्हटलं आहे.



13 वर्षांपासून गॅसपुरवठाच नाही


माध्यमांच्या वृत्तानुसार पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांतात अशा प्रकारच्या प्लास्टिक पिशव्यांचा सर्वाधिक वापर केला जात आहे. या भागात गॅस सिलिंडरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाल्याने विक्रेत्यांनी पुरवठा बंद केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, सर्वाधिक गॅसनिर्मिती खैबर पख्तुनख्वा भागातच होते. मात्र खैबर पख्तूनख्वाच्या करक जिल्ह्यातील लोकांकडे 2007 पासून गॅस कनेक्शन नाही. दुसरीकडे पाइपलाइन फुटल्यानंतर दुरुस्तीचे काम न झाल्याने गेल्या दोन वर्षांपासून हंगू जिल्ह्यात गॅस पुरवठा बंद आहे.


पाकिस्तानात किरकोळ दुकानात कॉम्प्रेसरद्वारे प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरुन लोकांना गॅस दिला जात आहे. या पिशव्यांमध्ये 2 किंवा 3 किलो एलपीजी गॅस भरला जातो. या प्लास्टिक पिशव्यांवर नोझल आणि व्हॉल्व्ह बसवले आहेत. गॅस सिलिंडर महागल्याने लोकांनी हा पर्याय निवडला आहे. वेगवेगळ्या आकाराच्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये 500 ते 900 रुपयांचा गॅस भरुन दिला जात आहे.