भारताने युद्ध लादले तर प्रत्युत्तर देऊ - पाकिस्तान
पाकिस्तानकडून युद्धाबाबत हालचाल सुरु नाही. भारत युद्धाची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी पाकिस्तान सज्ज आहे, अशा इशारा देण्यात आला आहे.
लाहोर : पुलवामा हल्ल्याबाबात पाकिस्तानच्या उलट्या बोंबा सुरु झाल्या आहेत. पाकिस्तानवर चौहोबाजुने दबाव येत आहे. त्यामुळे पाकिस्तानने हा हल्ला भारतीयानेच केल्याचा दावा केला आहे. पुलवामा हल्ल्यामध्ये काश्मीरींचा सहभाग असल्याचा पाकिस्तानच्या लष्कराने दावा केला आहे. पाकिस्तानकडून युद्धाबाबत हालचाल सुरु नाही. भारत युद्धाची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. निवडणुका आल्याने ही स्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, तिकडून हल्ला झाला तर पाकिस्तान आपल्या आत्मसंरक्षणासाठी तयार आहे. पूर्वीच्या युद्धातील पाकिस्तान नाही, असा इशारा पाकिस्तानने दिला आहे. पाकिस्तान बदलत आहे. पाकिस्तानमध्ये शांतता नांदत आहे. मात्र, पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानला ओढले जात आहे, असा दावा पाकिस्तानचे मेजर जनरल हासिफ गफूर यांनी पत्रकार परिषदेत केला.
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. याच पार्श्वभूमीवर युद्धाच्या चर्चांना सुरुवात झाली असतानाच पाकिस्तानी लष्कराने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. पुलवामा हल्ल्यानंतर जगभरातून टीकेची झोड उठलेल्या पाकिस्तानचा कांगावखोरपणा कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. पाकिस्तानी लष्कराने आज पत्रकार परिषद घेऊन हल्ल्याबाबत अत्यंत पोकळ दावे केले. हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली स्फोटके पाकिस्तानी नव्हती. काश्मीरमधील गाडी वापरून काश्मिरी तरुणानेच हा हल्ला केल्याचा दावा करताना भारत युद्धाची धमकी देत असल्याचा कांगावा पाकिस्तानी लष्कराचे मेजर जनरल आसीफ गफूर यांनी केला आहे.
१९४७ पासून काश्मिरींवर भारत अत्याचार करत आहेत, असा आरोपही पाकिस्तानने केला आहे. पाकिस्तानने नेहमीच शांततेसाठी प्रयत्न केले असून उलट भारतानेच बांग्लादेश निर्मितीच्या वेळेस दहशतवाद केल्याचेही पाकिस्तानने म्हटले आहे. काश्मीर लोकांकडून का हल्ले होत आहेत, हे भारताने समजून घ्यावे. भारताने पाकिस्तानच्या नेमबाजी खेळाडूंना व्हिसा नाकारला. तसेच टॉमेटोची निर्यातही थांबवली आहे. मात्र, आज पाकिस्तान बदल आहे. तरुणांना नोकरी आणि रोजगार देण्यासाठी प्रयत्न होत आहे. मात्र, काश्मीरमधील तरुणांवर हल्ले होत आहेत. ते हल्ल्यात सहभागी होत आहेत, याचा विचार न करता पाकिस्तानवर आरोप करण्यात येत आहेत, पाकिस्तानी लष्कराचे मेजर जनरल आसीफ गफूर यांनी म्हटले.