इस्लामाबाद : गर्दी टाळा, कोरोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे असे अनेक इशारे देऊनही अनेकजण या सर्व सूचनांची पायमल्ली करताना दिसतात. जिल्हाधिकारी कार्यालयात काम करणाऱ्या अशाच सहा अधिकाऱ्यांना याच कारणावरुन निलंबित करण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाची लागण झालेल्या सहकाऱ्यासोबत सेल्फी काढल्याप्रकरणी या अधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील ही घटना सध्या अनेकांनाच धक्का देऊन जात आहे. 


अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार खैरपूरच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी याविषयीचं एक पत्रक काढलं. ज्यामध्ये अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश देण्यात आले होते. इराणमधून परतलेल्या आणि त्यानंतर पुढे जाऊन कोरोना पॉझिटीव्ह ठरलेल्या आपल्या सहकाऱ्याच्या संपर्कात अजाणतेपणे आल्यामुळे आणि त्याची भेट घेतल्यामुळे त्यांना या कारवाईचा सामना करावा लागत असल्याचं म्हटलं जात आहे.


छाया सौजन्य- सोशल मीडिया 

 


 


इराणहून परतलेल्या आणि कोरोनाची लागण झालेल्या एका अधिकाऱ्यासोबतच्या त्यांच्या फोटोची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळाली. ज्यानंतर त्या सेल्फीमध्ये दिसणाऱ्या सर्वांनाच निरिक्षणाअंतर्गत ठेवण्यात आल्याचं या पत्रकात म्हटलं गेलं. 


जगभरात झपाट्याने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव अनेकांपुढे मोठी आव्हानं उभी करत आहे. या परिस्थितीमध्ये WHOकडूनही काही महत्त्वाचे निर्देश देण्यात आले आहेत. सावधगिरीचा इशारा म्हणून काही प्रतिबंधात्मक उपायही सांगण्यात आले आहेत. पण, गांभीर्याने, संयमाने आणि स्वयंशिस्तीने या परिस्थितीला सामोरं जाण्याऐवजी असं बेताल वागणं असंख्यजणांना धोक्यात टाकणआरं ठरेल याचा एकदा विचार झालाच पाहिजे.