Pakistan Terrorist Attack: पाकिस्तान (Pakistan) पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याने (Terrorist Attack) हादरलं आहे. बलुचिस्तानमधील (Balochistan) सिबी (Sibi) परिसरात आत्मघाती हल्लेखोराने केलेल्या हल्ल्यात 9 पोलीस कर्मचारी ठार झाले आहेत. आत्मघाती हल्लेखोराने दुचाकीने पोलिसांच्या ट्रकला धडक दिली. या धडकेनंतर भीषण स्फोट झाला. या स्फोटात होरपळून नऊ पोलीस ठार झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलीस प्रवक्त्याने रॉयटर्सशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, आत्मघाती हल्लेखोर दुचाकीवर स्वार होता. त्याने दुचाकीसह पोलिसांच्या ट्रकला धडक देत हा हल्ला केला. धडकेनंतर भीषण स्फोट झाला होता. या हल्ल्यात 7 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. दरम्यान अद्याप या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही. 



पोलिसांकडून प्राथमिकदृष्ट्या हा आत्मघाती हल्ला असल्याचा निष्कर्ष काढला जात असला तरी, नेमका हा हल्ला कसा करण्यात आला याची माहिती अधिकारी घेत आहेत. हल्ल्याची माहिती मिळताच बॉम्बशोधक पथक आणि सुरक्षा जवान घटनास्थळी दाखल झाले असून सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे. दरम्यान संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. 


बॉम्बस्फोटात मृत्यू झालेले पोलीस बलुचिस्तान कॉन्स्टेब्युलरी (बीसी) चे सदस्य आहेत, जो प्रांतीय पोलीस दलाचा एक विभाग आहे. हा विभाग  महत्त्वाच्या कार्यक्रमांना आणि तुरुंगांसह संवेदनशील भागात सुरक्षा पुरवत असतो. 


बलोचिस्तानच्या मुख्यमंत्र्यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून दहशतवाद्यांमुळेच या परिसरात विकास होत नसल्याचा आरोप केला आहे.