रावळपिंडी : पाकिस्तानच्या अनेक भागात कडाक्याच्या थंडीने कहर केला आहे. मुरी (पंजाब प्रांत) मधील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळी गेल्या काही दिवसांपासून प्रचंड बर्फवृष्टी होत आहे. ज्याचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक तेथे पोहोचले. त्यामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. त्यातच मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी झाल्याने २१ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. मृतांमध्ये ९ लहान मुलांचा समावेश आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने हिल स्टेशनवर आणीबाणी लागू केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


पाकिस्तानी प्रसारमाध्यमांच्या मते, मुरीमध्ये केवळ 4000 वाहनांची क्षमता आहे, पण यावेळी गेल्या 15-20 वर्षांचा विक्रम मोडला गेला आणि सुमारे 1.5 लाख वाहने आली. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. मुरी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की वाहतूक कोंडीमुळे लोकं गाड्यांमध्येच अडकली. प्रचंड थंडी आणि बर्फवृष्टीमुळे काही लोकांचा गाड्यांमध्येच मृत्यू झाला. कारमध्ये बसून मृत्यूमुखी पडलेल्यांचा वेदनादायक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.


पोलीस, स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकाने घटनास्थळी वेगाने मदतकार्य सुरु केल्याची माहिती पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री उस्मान बुजदार यांनी दिली. खबरदारीचा उपाय म्हणून मुरीकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे.



मुरी, पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादच्या उत्तरेस स्थित, समुद्रसपाटीपासून सुमारे 7500 फूट उंचीवर वसलेले एक छोटेसे पर्यटन स्थळ आहे. 19व्या शतकात ब्रिटीश सैन्याने त्याचा वैद्यकीय तळ म्हणून तो तयार केला होता. डोंगराळ भाग असल्याने पर्यटकांचे प्राण वाचवण्यासाठी पाकिस्तानी लष्कर बचावकार्यात गुंतले आहे. मात्र त्यांनाही बचाव कार्यात अडचणी येत आहेत.


बर्फवृष्टीमुळे रस्त्यावर अडकलेल्या पर्यटकांना सरकारी इमारती आणि शाळांमध्ये हलवण्यात आले आहे. जिथे स्थानिक जनतेच्या मदतीने त्यांना ब्लँकेट आणि अन्न पुरविण्यात आलं आहे.


पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी बर्फवृष्टीमुळे पर्यटकांचा मृत्यू झाल्याच्या बातमीने धक्का बसल्याचं म्हटलं आहे. हवामान आणि  बर्फवृष्टीची माहिती घेतल्याशिवाय मोठ्या संख्येने पर्यटक तिथे पोहचले. स्थानिक प्रशासनाची पुरेशी तयारी नव्हती. या प्रकरणाची चौकशी केली जाईल असं इम्रान खान यांनी म्हटलं आहे.