इस्लामाबाद : जम्मू काश्मीर प्रकरणात आखलेल्या कूटनीती अयशस्वी झाल्यानंतर पाकिस्तान हा मुद्दा आंतरराष्ट्रीय न्यायालयात (आयसीजे) नेण्यावर ठाम झाले आहे. आम्ही काश्मीर मुद्दा आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेण्याचा निर्णय घेतल्याचे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी एआरवाय न्यूज टीव्हीला सांगितले. सर्व कायदेशीर बाबींचा विचार झाल्यानंतरच हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर पाकिस्तानने हे पाऊल उचलले आहे. पंतप्रधान मोदी आणि इम्रान खान यांना आपले मित्र म्हणत दोघांनी काश्मीर मुद्द्यावर तणाव कमी करण्याचे आवाहन ट्रम्प यांनी केले होते. तसेच जम्मू काश्मीर मुद्द्यावर इम्रान खान यांनी वक्तव्य करताना संयम बाळगण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला.  माझे दोन चांगले मित्र पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी व्यापार, राजकारण आणि काश्मीर मुद्द्यावर चर्चा झाली. परिस्थिती कठीण आहे पण चांगली चर्चा घडल्याचे ट्वीट सोमवारी ट्रम्प यांनी केले.  



सौदीचे प्रिंस मोहम्मद बिन सलमान यांनी देखील काश्मीर परिस्थितीवर इम्रान खान यांच्याशी चर्चा केली.  इम्रान खान यांनी सध्याच्या स्थितीची माहीती सौदीच्या प्रिंसना दिली. इम्रान खान यांनी याप्रकरणी मुस्लिम बहुसंख्यांक देशांसहीत अनेक देशांच्या प्रमुखांना फोन केले. पण चीनचा अपवाद वगळता कोणत्याही देशाने त्यांचे समर्थन केले नाही.


मोदी-ट्रम्प चर्चा 


पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात फोनवरून तब्बल अर्धा तास चर्चा झाली. काश्मीरच्या मुद्यावर दोघांमध्ये चर्चा झाली. अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर मोदी आणि ट्रम्प यांच्यात पहिल्यांदाच ही चर्चा झाली. तसेच द्विपक्षीय संबंध आणि क्षेत्रीय संबंधांबाबतही चर्चा झाली.


मोदींनी दहशतवादाचा मुद्दा उचलत सीमेपलीकडून होणारा दहशतवाद रोखला पाहिजे, असे म्हटले आहे. दक्षिण आशियातील काही नेत्यांची विधान भारताविरोधात वातावरण तयार करत असल्याच सांगत मोदींनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना नाव न घेता टोला लगावला. 


दहशतवाद आणि हिंसामुक्त वातावरणासाठी शांतता गरजेची असल्याचंही मोदींनी यावेळी म्हटले आहे. गरीबीविरोधात लढण्यासाठी जगातील कोणत्याही देशाला सहकार्य करण्याची भारताची तयारी असल्याचेही मोदींनी यावेळी सांगितले.