जपानमध्ये मोदींच्या भाषणावेळी जय श्रीरामच्या घोषणा
१९७१ नंतर पहिल्यांदाच निवडणुकांमध्ये प्रो-इन्कम्बन्सी फॅक्टर पाहायला मिळाला.
टोकियो: जी-२० परिषदेसाठी जपानमध्ये गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ओसाकास्थित भारतीय जनसमुदायाशी संवाद साधला. यावेळी लोकांनी त्यांचे जोशपूर्ण स्वागत केले. तेव्हा मोदी व्यासपीठावर आल्यानंतर अनेकांनी जय श्रीराम आणि वंदे मातरमच्या घोषणा दिल्या. परदेशातील भारतीयांमध्ये मोदी लोकप्रिय असल्याचा प्रत्यय यानिमित्ताने पुन्हा एकदा आला.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, तुमच्या प्रेमासाठी खूप आभारी आहे. गेल्या सात महिन्यात मी दुसऱ्यांदा जपानमध्ये येण्याचे भाग्य मला लाभले. गेल्यावेळी मी याठिकाणी आलो होतो तेव्हा तुम्ही माझे मित्र शिंजो अबे यांना विजयी केले होते. तर आता भारतीय जनतेने प्रधानसेवक म्हणून माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवल्यानंतर मी याठिकाणी आलो आहे. १३० कोटी भारतीय जनतेने गेल्यावेळीपेक्षाही मजबूत सरकार दिले. ही खूप मोठी घटना आहे. १९७१ नंतर पहिल्यांदाच निवडणुकांमध्ये प्रो-इन्कम्बन्सी फॅक्टर पाहायला मिळाला. हा भारतीय लोकशाहीचा खरा विजय असल्याचे मोदींनी सांगितले. 'सबका साथ, सबका विकास' आणि त्यामध्ये लोकांनी 'सबका विश्वास' आणले. हा मंत्र घेऊन आम्ही पुढे जात आहोत. भारताला अजून सक्षम करणार असल्याचेही मोदींनी म्हटले.
जपानमध्ये होत असलेल्या जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी नरेंद्र मोदी यांचे ओसाकामध्ये आगमन झाले. जी-२० परिषदेत पंतप्रधान मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इतर राष्ट्रप्रमुखांच्या भेटी घेतील. यावेळी भारताकडून पुन्हा एकदा दहशतवादाचा मुद्दा मांडला जाण्याची शक्यता आहे.