अमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची सीईओंसोबत बैठक
अमेरिकेत दाखल झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदींची वॉशिंग्टनमध्ये २० महत्त्वाच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या सीईओंसोबत बैठक झाली.
वॉशिंग्टन : अमेरिकेत दाखल झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदींची वॉशिंग्टनमध्ये २० महत्त्वाच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या सीईओंसोबत बैठक झाली. वॉशिंग्टनमधल्या हॉटेल विलार्ड इंटरकॉन्टिनेन्टलमध्ये ही बैठक झाली. मायक्रोसॉफ्ट, गूगल, ऍपल, या आणि इतर कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी या बैठकीत सहभागी झाले आहेत.
या बैठकीत भारतात गुंतवणुकीचे लाभ तसंच पुढल्या महिन्यात भारतात लागू होत असलेल्या जीएसटीच्या मुद्द्यावरही चर्चा झाली. पुढच्या महिन्यात लागू होणाऱ्या जीएसटीमुळे भारत हा आता बिझनेस फ्रेंडली देश झाला आहे. त्यामुळे कंपन्यांनी भारतामध्ये गुंतवणूक करावी, असं मोदींनी या बैठकीमध्ये सीईओंना सांगितलं. मागच्या तीन वर्षांमध्ये भारतात सगळ्यात जास्त परकीय गुंतवणूक आल्याचंही मोदींनी या बैठकीत सांगितलं.
दरम्यान पंतप्रधान उद्या अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. ट्रम्प यांनी मोदींचं ट्विटरवरुन स्वागत करत 'खरा मित्र' असा त्यांचा उल्लेख केलाय. अमेरिकेत भारताचे राजदूत नवतेज सरना आणि त्यांची पत्नी अविना सरना तसेच अमेरिकेच्या भारतातील राजदूत मेरी के लॉस कार्लसन यांनी मोदींचं स्वागत केलं. मोदींच्या स्वागतासाठी जॉइंट बेस अँड्र्यूज विमानतळावर भारतीय समुदायाचे नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
पंतप्रधान पदाची सूत्र सांभाळल्यानंतर मोदींचा हा पाचवा अमेरिका दौरा आहे. उद्या मोदी आणि ट्रम्प यांची भेट होणार आहे. या भेटीदरम्यान त्यांच्यात तब्बल पाच तास चर्चा होणार असल्यासं सांगण्यात येत आहे. मोदींच्या सन्मानार्थ यावेळी ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये डिनरचं आयोजन केलंय. या दौ-यादरम्यान दोन्ही नेते दहशतवाद, भारताच्या संरक्षण क्षेत्रातील आधुनिकीकरणात अमेरिकेची मदत आणि दोन्ही देशातील व्यापारी संबंधाच्या बळकटीसंदर्भात चर्चा करणार आहेत.