९ वर्षांचा मोशे म्हणतो मोदी तुम्ही मला आवडता
मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा पीडित मोशे होल्झबर्ग याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेरुसलेममध्ये भेट घेतली.
जेरुसलेम : मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा पीडित मोशे होल्झबर्ग याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेरुसलेममध्ये भेट घेतली. यावेळी तुम्ही मला आवडता असं ११ वर्षांच्या लहानग्या मोशे यानं मोदींना सांगितलं. तर तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू भारताला भेट देऊ शकतोस असं आमंत्रण देतानाच, तुला आणि तुझ्या कुटुंबाला दिर्घ मुदतीचा व्हीसा दिला जाईल असं मोदींनी मोशेला यावेळी आश्वासन दिलं.
२६ नोव्हेंबर २००८ ला मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. बेबी मोशे आणि त्याचे इस्त्रायली आई-वडील मुंबईच्या नरीमन हाऊसमध्ये राहात होते. २६ नोव्हेंबर २००८ ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात नरिमन हाऊसला लक्ष्य करण्यात आलं. या हल्ल्यात १७३ लोकांचा मृत्यू झाला. त्यामध्ये बेबी मोशेचे आई-वडीलही होते. त्यावेळी दोन वर्षांच्या मोशेला त्याला सांभाळणाऱ्या सैंड्रा सैम्युअल या महिलेनंवाचवलं.
२६ नोव्हेंबरच्या हल्ल्यात मोशेनं त्याचे आई वडील गमावले. मोशेच्या आई - वडिलांच्या मृत्यूनंतर त्याचे आजी-आजोबा मोशेला इस्रायलला घेऊन गेले. मोशेला सांभाळणारी सँड्रा सॅम्युअलही इस्त्रायलला गेली... तिनं स्वतःच्या मुलासारखं मोशेला सांभाळलंय.
२६/११ च्या घटनेनंतर मोशेला इस्त्रायलचं नागरिकत्व देण्यात आलं. सँड्रालाही दोन वर्षांनंतर इस्रायलचं नागरिकत्व दिलं गेलं. तसंच सँड्रानं दाखवलेल्या धैर्याबद्दल तिचा इस्त्रायलमध्ये सन्मानही करण्यात आला.