काठमांडू: गलवान खोऱ्यातील भारत-चीन संघर्षानंतर आता नेपाळमधील काही समाजविघातक शक्तींनी भारताविरोधात गरळ ओकायला सुरुवात केली आहे. नेपाळमधील कम्युनिस्ट पक्षाचा नेता नेत्रा बिक्रम चंद याने भारतीय लष्करातील गोरखा जवानांना चीनविरोधात न लढण्याचे आवाहन केले आहे. नेपाळ सरकारने नेत्रा बिक्रम चंदच्या संघटनेवर बंदी घातली होती. तेव्हापासून नेत्रा बिक्रम चंद भूमिगत झाला आहे. नेपाळमधील डाव्या विचारसरणीच्या लोकांपैकी एक मोठा वर्ग नेत्रा बिक्रम चंद यांना मानणारा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

...म्हणून नेपाळमध्ये रेडिओवर सुरु आहेत भारतविरोधी गाणी


या पार्श्वभूमवीर नेत्रा बिक्रम चंद याच्या ताज्या वक्तव्याने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. १५ जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात भारत आणि चिनी सैनिकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली होती. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले होते. यानंतर भारतीय लष्कराकडून सुट्टीवर गेलेल्या गोरखा रेजिमेंटमधील जवानांना तात्काळ ड्युटीवर रुजू होण्याचे आदेश दिले होते. याचा अर्थ भारतीय लष्कराकडून आपल्या नेपाळी बांधवांना चीनविरोधी युद्धात उतरवले जाणार आहे. मात्र, नेपाळचे परराष्ट्र धोरण हे अलिप्ततावादाचे आहे. त्यामुळे भारताने गोरखा जवानांना चीनविरोधी युद्धात उतरवणे, हे नेपाळच्या परराष्ट्र धोरणाच्या विरोधात आहे. नेपाळ हा एक स्वतंत्र देश आहे. त्यामुळे नेपाळमधील जवान एखाद्या देशाच्या लष्करामध्ये काम करत असतील तर त्यांच्या दुसऱ्या देशाविरुद्धच्या लढाईत वापर करणे योग्य नाही, असे नेत्रा बिक्रम चंद याने म्हटले आहे. 

भारतीय लष्करामधील गोरखा रेजिमेंटचे स्थान हे अनन्यसाधारण आहे. पर्वतीय प्रदेशामध्ये गोरखा जवान हे मोठ्याप्रमाणावर तैनात असतात. पर्वतीय प्रदेशात गोरखा जवानांपेक्षा चांगली लढाई कोणीही लढू शकत नाही, असे म्हटले जाते. त्यामुळे आगामी काळात चिनी सीमेवर गोरखा रेजिमेंटची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.