बिजिंग : डोकलाममुळे वाढलेला तणाव मागे सारत भारत आणि चीननं पुन्हा एकदा परस्पर संबंध दृढ करण्याच्या आणाभाका घेतल्या. ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर चीनच्या सिआमेन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी द्विपक्षीय चर्चा केली.


डोकलामसारख्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी संरक्षण क्षेत्रातल्या अधिकाऱ्यांमध्ये परस्पर सहकार्य वाढवण्याचा निश्चय या भेटीत करण्यात आला आहे. भारत आणि चीन हे देश एकमेकांसाठी धोका नसून संधी असल्याची भावना जिनपिंग यांनी व्यक्त केल्याची माहिती चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या गेंग शुआंग यांनी दिली. भारतीय परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनीही मोदी-जिनपिंग भेटीत सकारात्मक चर्चा झाल्याचं स्पष्ट केलं आहे.