न्यूयॉर्क : अमेरिकेत कोरोनाचा वाढता कहर पाहता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्राझीलमधून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे. ब्राझीलमध्ये देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ पाहता अमेरिकेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गेल्या २४ तासांत ब्राझीलमध्ये १६ हजार ५०८ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. आता ब्राझीलमधील कोरोना रुग्णांची संख्या ३ लाख ६५ हजारांवर पोहोचली आहे. तर दुसरीकडे अमेरिकेतही कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्राझीलमधून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घालणार असल्याचं वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताचं केलं होतं. ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांना सांगितले होते की, 'ब्राझीलमधील नागरिकांनी अमेरिकेत यावं आणि येथील लोकांना संक्रमीत करावं असं मला बिलकूल वाटत नाही.' अमेरिका व्हेंटिलेटर देवून ब्राझीलची मदत करत असल्याचं देखील ट्रम्प यांनी सांगितले. 


दरम्यान ब्राझीलवर लादण्यात आलेली ही बंदी कायम स्वरूपी नसून ठरावीक कालावधीसाठी असल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ ब्रायन यांनी शनिवारी सीबीएस फेस द नेशनला दिली. सांगायचं झालं तर अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे. 


अमेरिकेत  १६ लाख ८ हजार लोकांना कोरोनाची लागण झाली  आहे. त्यापैकी ९८ हजार ०२४ रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. तर दिलासादायक बाब म्हणजे ३ लाख ४२ हजार  रुग्ण कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडले आहेत 


तर ब्राझीलमध्ये ३ लाख ६५ हजार लोकांना कोरोनाची लागण झाली  आहे. त्यापैकी २२ हजार ७४६ रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. तर दिलासादायक बाब म्हणजे १ लाख ५ हजार  रुग्ण कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडले आहेत.