वॉशिंग्टन : कृष्णवर्णीय अमेरिकन जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूनंतर अमेरिकेत हिंसक वातावरण सुरू आहे. अमेरिकेतील विरोध प्रदर्शन पाहता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी बंडखोरी कायदा लागू करण्याची धमकी दिली आहे. हा एक जुना कायदा आहे, जो देशातील घरगुती हिंसाचार संपविण्यासाठी अमेरिकन सैन्य पाठवण्यास राष्ट्राध्यक्षांना अधिकार देतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हाईट हाऊसच्या रोझ गार्डनमधून राष्ट्राला संबोधित करताना अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, 'एखादे शहर किंवा राज्य आपल्या रहिवाशांचे जीवन व संपत्ती सुरक्षित करण्यासाठी आवश्यक कृती करण्यास नकार देत असेल तर मी आर्मी तैनात करुन लवकरच त्यांच्या समस्येचे निराकरण करेल.'


विशेष म्हणजे 25 मे रोजी मिनेसोटा येथे कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉयडचा पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू झाला. केवळ 20 डॉलरची बनावट नोट चालवण्याच्या आरोपाखाली जॉर्जला पकडले होते. एका पोलीस कर्मचाऱ्याने त्याला जमिनीवर ढकलले आणि त्याचा मृत्यू होईपर्यंत त्याची मान पायाने धाबून ठेवली.


या घटनेमुळे अमेरिकेत प्रचंड राग उसळला आहे. या विरोधात फक्त कृष्णवर्णीयच नाही तर इतर लोकं देखील रस्त्यावर उतरले आहेत. अमेरिकेच्या रस्त्यावर हिंसक निदर्शने होत आहेत. सोमवारी व्हाईट हाऊसच्या बाहेर आंदोलकांनी निदर्शने केली. हे निषेध रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला.


निषेध आणि हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी ट्विट केले की, "राज्यपाल आणि मेयर्स हे हिंसाचाराविरोधात कठोर असले पाहिजेत." जर तसे झाले नाही तर फेडरल सरकार पाऊल उचलेल. ज्यामध्ये आमच्या सैन्याला अमर्याद शक्ती प्राप्त होईल आणि ते बर्‍याच जणांना अटक करू शकतील.'