वॉशिंग्टन : अमेरिकेचे खासदार ब्रॅड शरमन यांच्या म्हणण्यानुसार, काश्मीरच्या मुद्यावर मध्यस्थतेबद्दल राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रस्ताव हा खूपच बालिश आणि लज्जास्पद आहे. त्यांनी ट्रम्प यांच्या या चुकीबद्दल वॉशिंग्टनमधील भारताचे राजदूत हर्ष वर्धन श्रृंगला यांच्याकडे माफी मागितली आहे. कॅलिफोर्नियाच्या सॅन फर्नाडो व्हॅलीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या शरमन यांच्या म्हणण्यानुसार, 'भारतानं काश्मीरच्या मुद्यावर तिसऱ्या पक्षाच्या मध्यस्थतेचा नेहमीच विरोध केलाय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्रम्प यांना मध्यस्थतेबद्दल विनंती केली असेल असं वाटत नाही' असं म्हटलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'दक्षिण आशियाच्या परराष्ट्र नीतींबद्दल ज्याचा अभ्यास असेल त्याला हे माहीत असेल की भारतानं नेहमीच काश्मीरच्या मुद्यावर कोणत्याही तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप नाकारलाय. प्रत्येकाला माहीत आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा प्रकारचा प्रस्ताव कधीही ठेवणार नाहीत. ट्रम्प यांचा हा दावा भ्रामक आणि लज्जास्पद आहे' असंही शरमन यांनी म्हटलंय. 


दरम्यान, काश्मीरप्रश्नी मध्यस्थीसाठी भारताने कोणतीही भूमिका मांडलेली नाही, असं परराष्ट्रखात्याचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी स्पष्ट केलंय.



ट्रम्प यांचा अजब दावा


काश्मीरप्रश्नी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याकडे मध्यस्थीची विनंती केली होती असा खळबळजनक दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय.ट्रम्प आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची काल भेट झाली. यावेळी इम्रान यांनी पाकिस्तानचं रडगाणं गायलं. त्यावर भारतानं मध्यस्थीची विनंती केल्याचं अचाट विधान ट्रम्प यांनी बेजबाबदारपणे केलं. 


भारतानं ट्रम्प यांचा हा दावा तातडीनं फेटाळलाय. मोदींनी असा कोणताही दावा केलेला नाही असं भारतानं स्पष्ट केलंय. पाकिस्तानशी सर्व प्रलंबित मुद्दे द्वीपक्षीय चर्चेनंच सुटतील असं भारतानं स्पष्ट केलंय. काश्मीरप्रश्नी कोणतीही मध्यस्थी भारताला अमान्य आहे ही भारताची अनेक वर्षांची भूमिका असल्याचं परराष्ट्र खात्यानं स्पष्ट केलंय. विशेष म्हणजे ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर व्हाईट हाऊसनं जारी पत्रकात काश्मीरचा उल्लेख टाळलाय. दक्षिण आशियात शांतता नांदावी अशी अमेरिकेची इच्छा असून त्यासाठी वातावरण निर्मिती करण्यास कटिबद्ध असल्याचं व्हाईट हाऊसनं जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय. यावरून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प खोटं बोलले असल्याचं स्पष्ट होतंय.