फ्रान्समध्ये आंदोलन भडकलं, महापौरांचं कुटुंब झोपेत असतानाच घरात घुसवली कार; नंतर लावली आग
France Protest: फ्रान्सची राजधानी पॅरिस (Paris) सध्या आंदोलनामुळे धगधगत आहे. दिवसेंदिवस आंदोलन भडकत असून, आंदोलकांनी थेट कारच महापौरांच्या घरात घुसवली आहे. या हल्ल्यात आपली पत्नी आणि मुलगी जखमी झाल्याची माहिती महापौरांनी दिली आहे.
France Protest: फ्रान्सची राजधानी पॅरिस (Paris) सध्या आंदोलनामुळे धगधगत आहे. पॅरिसमध्ये गेल्या 5 दिवसांपासून आंदोलन सुरु असून, मोठया प्रमाणात सुरक्षा तैनात करण्यात आलेली असतानाही आंदोलक मागे हटण्यास तयार नाही. दिवसेंदिवस आंदोलन पेटत असून, ते शमवण्याचे प्रयत्न सध्या अपयशी ठरताना दिसत आहेत. अल्पवयीन 17 वर्षीय मुलावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारानंतर संतप्त झालेल्या नागरिक रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध करत आहेत. पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत 719 जणांना अटक केली आहे.
फ्रान्सचे गृहमंत्री गेराल्ड डरमॅनिन (Gerald Darmanin) यांनी सांगितलं आहे की, मंगळवारी पॅरिसच्या नॅनटेरे उपनगरात 17 वर्षीय नाहेलच्या मृत्यूवरून दंगली उसळल्यापासून कमी हिंसाचार झाल्याचं दिसत आहे.
महापौरांच्या घरात घुसवली कार
दरम्यान, आंदोलकांनी पॅसिरच्या दक्षिण शहरातील महापौरांच्या घरात कार घुसवली आहे. महापौरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची पत्नी आणि एक मूल या हल्ल्यात जखमी झाले आहेत. महापौर व्हिन्सेंट जीनब्रुन (Vincent Jeanbrun) यांनी ट्विटरवर लिहिले की, आपलं कुटुंब झोपलेले असताना आंदोलकांनी घराला आग लावण्याआधी त्यांच्या घरात कार घुसवली.
"काल रात्री आंदोलनाने भयावह स्थिती गाटली," असं L'Hay-les-Roses शहराच्या महापौरांनी म्हटलं आहे. "माझी पत्नी आणि माझं एक मूल जखमी झालं आहे. हा भ्याडपणे करण्यात आला खुनाचा प्रयत्न होता,” असा आरोप त्यांनी केला आहे.
45,000 हून अधिक पोलिस, विशेष पथकं, शस्त्रसज्ज वाहनं आणि हेलिकॉप्टरसह फ्रान्समधील तीन सर्वात मोठी शहरं पॅरिस, ल्योन आणि मार्सिले यांच्यावर गस्त घालत होते. 10 शॉपिंग मॉल्स, 200 हून अधिक सुपरमार्केट, 250 तंबाखूची दुकाने आणि 250 बँक आउटलेटवर हल्ले करण्यात आले आहेत किंवा लुटले आहेत, अशी माहिती अर्थमंत्री ब्रुनो ले मायरे यांनी दिली आहे. आंदोलकांनी ग्रिग्नी येथील निवासी इमारतीला आग लावल्याचेही वृत्त आहे.
पोलिसांनी पाचव्या रात्री 719 लोकांना अटक केली आहे. यामधील बहुतेक अल्पवयीन आहेत अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान शनिवारी रात्री फ्रान्स पोलिसांनी 1300 लोकांना ताब्यात घेतले होते.
नेमकं काय घडलं?
27 जून पॅरिसच्या उपनगरात वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 17 वर्षीय नाहेल. एम नावाच्या मुलावर पोलिसांनी गोळीबार केला. या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आणि लोक रस्त्यावर उतरले. फ्रान्स आणि पॅरिसमधील उपनगरात लोक रस्त्यावर उतरून सरकार आणि पोलिसांचा निषेध करत आहेत. या आंदोलनाला हिंसक वळण आलं आहे.