अमेरिकन दूतावासाजवळ क्षेपणास्त्र हल्ला, संघर्ष अधिक तीव्र
. अमेरिकन दूतावासाजवळ २ क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला आहे.
इराक : इराकची राजधानी बगदादमध्ये क्षेपणास्त्र हल्ला झाला आहे. अमेरिकन दूतावासाजवळ २ क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला आहे. त्यामुळे इराक-अमेरिका संघर्ष येणाऱ्या काळात आणखी तीव्र होणार आहे. इराणने इराकमधल्या अमेरिकेच्या २ लष्करी तळांवर आतापर्यंत २२ क्षेपणास्त्र डागल्यानं इराण आणि अमेरिकेतील संघर्ष तीव्र झाला आहे. त्यातच पुन्हा एकदा इराकची राजधानी बगदादमधल्या अतिसुरक्षित ग्रीन झोनमध्ये २ क्षेपणास्त्र डागली. या हल्ल्यात कुठलीही हानी झाली नसल्याचा दावा इराकने केला आहे.
अमेरिकेच्या दुतावासापासून केवळ १०० मीटर अंतरावर यातलं एक क्षेपणास्त्र कोसळलंय. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कुणीही घेतलेली नाही. इराकच्या अल असद बेसची छायाचित्रं जारी करण्यात आली आहेत. हल्ल्याआधी आणि नंतरच्या छायाचित्रांत मोठा फरक दिसून येतोय. नुकसान झाल्याचं छायाचित्रांमध्ये स्पष्ट दिसून येत आहे.
दरम्यान इराणसमर्थक मिलिशियानं याआधी ५ जानेवारीला बगदादच्या ग्रीन झोनवर क्षेपणास्त्र डागली होती. अमेरिकेच्या दुतावासाला त्या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आलं होतं. तसाच हल्ला बुधवारी उशिरा रात्री हल्ला करण्यात आला. मात्र हा हल्ला नेमका कुणी केला हे मात्र स्पष्ट झालेलं नाही.
इराकमधील अल असद बेसची काही छायाचित्रे उपग्रहानं प्रसिद्ध केलीत. इराणनं अमेरिकेच्या बेस कँम्पवर केलेल्या हल्ल्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे.
इराकमधील अमेरिकन बेस कँम्पवर इराणनं केलेल्या हल्ल्यावर ब्रिटननं टीका केली आहे. इराणनं अशी कारवाई करायला नको होती असं ब्रिटननं म्हटले आहे. फ्रान्स आणि जर्मनीनंही अमेरिकेला संयम राखण्याचा सल्ला दिला आहे. तर भारताकडून मिळणाऱ्या कोणत्याही शांततेच्या प्रयत्नांचं इराण कडून स्वागत होईल असं भारतातील इराणचे राजदूत अली चेगनी यांनी म्हटले आहे.
इराणनं अमेरिकेवर केलेल्या हल्लयात अमेरिकेचं कोणतंही मोठं नुकसान होणार नाही याची काळजी घेतल्याची माहिती अमेरिका आणि युरोप सरकारच्या सूत्रांकडून मिळतीये. अमेरिकेसोबत तणाव वाढू नये अशी इराणची भूमीका असल्याचं यातून स्पष्ट होत आहे.