मुंबई : 'डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्स' अर्थात एमएसएफनं एक धक्कादायक वास्तव समोर आणलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑगस्ट महिन्यात म्यानमारच्या रखाइन प्रांतात सुरू झालेल्या हिंसेला पहिल्याच महिन्यात जवळपास ६ हजार ७०० रोहिंग्या मुसलमान बळी पडल्याचं एमएसएफचं म्हणणं आहे. यामध्ये पाच वर्षांहून कमी वयाच्या ७३० बालकांचाही समावेश आहे. बांग्लादेशच्या शरणार्थींच्या सर्व्हेनंतर एमएसएफनं हे विधान केलंय.


उल्लेखनीय म्हणजे, ही संख्या अधिकृत आकड्यांच्या कित्येक पटीनं मोठी आहे. याआधी आलेल्या अधिकृत आकड्यांत केवळ ४०० रोहिंग्या मुसलमानांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आलीय. म्यानमार सेनेनं हिंसेत ४०० जणांचा मृत्यू झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला होता. यामध्ये अधिकांश मुस्लिम असल्याचंही म्हटलं गेलं होतं. 


एमएसएफच्या म्हणण्यानुसार, आत्तापर्यंत साडे सहा लाख रोहिंग्यांनी बांग्लादेशात शरणागती पत्करलीय. 


सर्व्हेमध्ये २५ ऑगस्ट ते २४ सप्टेंबर दरम्यान जवळपास ९००० रोहिंग्या मारले गेल्याचं म्हटलंय. यातील ६९ टक्के लोकांचा मृत्यू गोळी लागून झालाय. ९ टक्के लोकांचा मृत्यू घरात लागलेल्या आगीत होरपळून झाला तर ५ टक्के लोकांचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचाही यात उल्लेख करण्यात आलाय.