`या` शाही जोडप्याला लागली नव्या पाहुण्याची चाहूल
पाहा हे जोडपंं आहे तरी कोण...
मुंबई: कुटुंबात येणाऱ्या प्रत्येकाचीच चाहूल ही आनंदाची बरसात करुन जाते. त्यातही नव्या बाहुण्याच्या रुपात तान्हुल्या बाळाचं आगमन होणार असेल तर, वातावरणातील आनंद शब्दातही व्यक्त करता येत नाही. सध्याच्या घडीला एका शाही कुटुंबात अशीच आनंदची लाट आली आहे.
शाही कुटुंब....? नेमकं कोणतं.... पडलात ना तुम्हीही विचारात? ते शाही कुटुंब आहे ब्रिटनचं. प्रिन्सेस युजिनीच्या लग्नाच्या चर्चांमुळे प्रकाशझोतात आलेलं हे कुटुंब पुन्हा एकदा सर्वांच्याच शुभेच्छांसाठी पात्र ठरलं आहे.
शुभेच्छा देण्याचं कारण की, काही महिन्यांपूर्वीच विवाहबंधनात अडकलेल्या मेगन मार्कल आणि प्रिन्स हॅरी यांच्या आयुष्यात नव्या पाहुण्याची चाहूल लागली आहे.
पुढच्या वर्षीचा वसंत ऋतू हा या शाही जोडप्यासाठी नव्या पाहुण्याला सोबत घेऊनच येणार आहे.
प्रिन्सेस युजिनीच्या विवाहसोहळ्या खुद्द राणीनेच ही आनंदाची बातमी सर्वांना दिली. ज्यानंतर ब्रिटनच्या राजघराण्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन याविषयीची घोषणा करण्यात आली.
'ड्युक आणि डचेस ऑफ ससेक्स यांना हे सांगण्यास अतिशय आनंद होत आहे की, पुढच्या वर्षीच्या म्हणजेच 2019 च्या वसंत ऋतूमध्ये त्यांच्या जीवनात नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे', अशा कॅप्शनसह प्रिन्स हॅरी आणि मेगनचा सुरेख असा फोटोही पोस्ट करण्यात आला.
सोशल मीडियावर ही बातमी जाहीर होताच, अवघ्या काही क्षणांमध्ये अनेकांनीच या जोडीला शुभेच्छा देण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं.