नवी दिल्ली : रशियातला एक चमत्कार... रशियामध्ये लोक दारु पिऊन बाटल्या समुद्रात टाकायचे. पुढे त्या बाटल्यांचं असं काही झालं, ज्याचा विचारही कुणी केला नसेल. रशियातल्या एका समुद्रावर रंगीबेरंगी दगड आहेत. तसे समुद्रकिनारी शंख शिंपले आणि असे रंगीत दगड मिळणं नवं नाही. पण या दगडांमागची गोष्ट फारच वेगळी आहे. रशियामधला हा उसुरी समुद्रकिनारा, उत्तर पॅसिफिक समुद्राचा एक भाग आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खूप वर्षांपूर्वी रशिया सोव्हियत युनियन होतं, त्यावेळी पर्यावरणासंदर्भात फारशी जागृती नव्हती. रशियन्स भरपूर दारु प्यायचे आणि या उसुरी समुद्रात दारुच्या बाटल्या फेकून द्यायचे. त्या काळी उसुरी समुद्र हा व्होडकास वाईन, बिअरच्या बाटल्यांसाठी डम्पिंग ग्राऊण्डच झाला होता. त्या बाटल्या जलचरांचा जीव घेतील, याचा मागमूसही तेव्हा कुणाला नव्हता.


या रंगीबेरंगी बाटल्या समुद्रात फेकल्या जायच्या. पुढची काही वर्षं समुद्राच्या लाटा या सगळ्या दारुच्या बाटल्यांबरोबर मनसोक्त खेळल्या आणि त्यातूनच रंगीबेरंगी दगडांची निर्मिती झाली.  निसर्ग काय करु शकतो, त्याचा हा रंगीबेरंगी चमत्कारच आहे.


काच आणि पोर्सिलीनचे सगळे दगड आहेत. असे लाखो दगड या समुद्रकिनाऱ्यावर फेकले जातात. विशेष म्हणजे त्यामुळे हा समुद्रकिनारा ग्लास बीच म्हणून ओळखला जातो. आणि पर्यटकांसाठीचा हा हक्काचा बीच ठरलाय. फेकून दिलेल्या दारुच्या बाटल्यांमधून इतकी सुंदर निर्मिती होऊ शकेल, याचा विचार स्वप्नातही कुणी केला नसेल. 


ही सगळी निसर्गाची किमया आहे. पण हे पाहून कृपा करुन आपल्याकडे कुठल्याही बाटल्या समुद्रात टाकू नका. आणि प्लास्टिकबद्दल तर अशी किमया मुळीच होणार नाही. पर्यावरणाची काळजी घ्या.