Corona : `येथे` कल्पनेपेक्षाही परिस्थिती वाईट...
कोरोनाग्रस्तांचा आकडा हा.....
मॉस्को : Coronavirus कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव आता जगभरात पसरू लागला आहे. किंबहुना काही देश या विळख्यात हतबल झाले आहेत. रशियामध्येही कोरोनाचं थैमान सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.
'रॉयटर्स'च्या वृत्तानुसार मॉस्कोच्या महापौरांनी राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांना मॉस्को येथील परिस्थितीचा आढावा देत असताना कोरोनाग्रस्तांचा आकडा हा प्रत्यक्षात दिसत आहे, त्याहूनही जास्त असल्याची चिंताजनक बाब सांगितली. ज्यानंतर पुतिन यांनीही परिस्थितीचा आढावा घेतला.
सध्याच्या घडीला रशियामध्ये जवळपास 495 कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. ज्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. पश्चिम युरोपातील परिस्थितीच्या तुलनेत ही परिस्थिती किमान नियंत्रणात येण्याजोगी असल्याचं चित्र आहे.
खुद्द पुतिन यांनीच रशियातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगितलं होतं. पण, त्यानंतर सावधगिरी म्हणून रशियातील नाईट क्लब, सिनेमागृह आणि सार्वजनिक ठिकाणं कोरोनाचा प्रसार होऊ नये या कारणासाठी बंद करण्यात आली.
सध्याच्या घडीला मॉस्कोमधील आव्हानाचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे परदेशवारीहून अनेकजण येथे परतत आहेत. तर, काहीजण सुट्टीच्या कारणाने देशाच्या विविध भागांमध्ये आहेत. काहींनी स्वत:विलगीकरणात ठेवलं आहे. ज्यामुळे त्यांच्या चाचण्या करणं कठीण होत आहे. परिणामी अस्वस्थ नागरिकांची संख्या जास्त असण्याची चिंताजनक बाब समोर येत आहे.
दरम्यान, कोरोनाचा विळखा बसलेल्या राष्ट्रांमध्ये असणाऱ्या सर्व नागरिकांना त्यांच्या इच्छेने परत आणण्यासही रशियन सरकार तत्पर आहे. एकंदरच परिस्थिती पाहता येत्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरातून कमी व्हावा अशीच प्रार्थना आता सर्व स्तरांतून केली जात आहे.