मास्को : Russia Ukraine War : जगावर पुन्हा एकदा अणुयुद्धाचं संकट गडद झाल्याचे दिसत आहे. कारण आक्रमक झालेल्या रशियाने पुन्हा अणुयुद्धाची धमकी दिली आहे. तिसरे महायुद्ध हे अणुयुद्ध असेल आणि सर्वात विनाशकारी असल्याचे विधान रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी केले आहे. त्यामुळे अणुबॉम्ब हल्ल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. (Russia's threat again, the crisis of nuclear war on the world once again)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रशिया युक्रेनला अण्वस्त्र मिळू देणार नाही, असेही सर्गेईंनी स्पष्ट केले आहे. युक्रेनवर हल्ला केल्यामुळे युरोपियन देशांनी रशियावर कडक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे रशिया आता चांगलाच आक्रमक झाला असून थेट अणू हल्ल्याचीच भाषा सुरू केली आहे. तर आम्ही चर्चेच्या दुसऱ्या फेरीसाठी तयार आहोत, पण धमक्या देऊ नका, असे युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्कींनी सुनावले आहे. 


रशियाची नवी चाल


झेलेन्स्कींच्या जागी यान्कोविचना राष्ट्रपती बनवण्यासाठी रशियाची धडपड सुरू आहे. पुतीन यांचा हा नवा प्लॅन आहे असा आरोप युक्रेनने केला आहे. 2014 मध्ये युक्रेनमधून यान्कोविच यांना पदच्युत करण्यात आलं होते. त्यांना पदावर बसवल्यास रशियाला युक्रेन आपल्या तालावर नाचवता येईल. त्यामुळेच यान्कोविच यांच्यासाठी रशियाचा खटाटोप सुरू आहे, असे युक्रेनने म्हटले आहे.


 जगाला याची मोठी किंमत मोजावी लागेल



रशिया आणि युक्रेन युद्धात अण्विक अस्त्रांचा वापर होण्याची भीती व्यक्त होत आहे. हे युद्ध अण्विक युद्धात बदललं तर जगाला याची मोठी किंमत मोजावी लागेल. रशिया-युक्रेन युद्ध अणुयुद्धात बदललं तर इथं अक्षरश: मृत्यूचं थैमान पाहायला मिळेल. मुंबईवरही युद्धाचे तीव्र पडसाद उमटू शकतात. 


अणुयुद्ध झाल्यास जगात हाहाकार 


रशियाने युक्रेनवर बॉम्ब आणि मिसाईलचा वर्षाव केला आहे. तर युक्रेननेही रशियाला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मात्र आता जगाला एका वेगळ्याच चिंतेने ग्रासलंय. ही भीती आहे अणुयुद्धाची. रशिया-युक्रेन युद्धात अणुयुद्धाचा वापर होऊ शकतो अशी शक्यता स्विर्त्झलँडमधील ICAN या संस्थेने वर्तवलीय. 2017 मध्ये या संस्थेने शांततेचा नोबेल पुरस्कारही पटकावला आहे. अणुबॉम्बचा हल्ला झाला तर जगाला फार मोठी किंमत मोजावी लागेल असं या संस्थेनं आपल्या अहवालात म्हटलं आहे.


अणुयुद्ध झाल्यास काय होईल ? 


ICAN च्या अभ्यासानुसार रशिया-युक्रेन युद्धात अणुबॉम्बचा वापर झाल्यास अवघ्या अर्ध्या तासात 10 कोटी लोकं मृत्यूमुखी पडतील. सध्या जगात असलेल्या अण्वस्त्रांपैकी एक टक्क्यांहून कमी अण्वस्त्रांचा वापर केला तर जवळपास दोन अब्ज नागरिकांना उपासमारीचा सामना करावा लागेल. त्याशिवाय आरोग्य व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणावर ताण येईल. 
मुंबईसारख्या शहरात जिथे प्रत्येक किलोमीटरच्या परिघात 1 लाखांहून अधिक लोकं राहतात तिथं हिरोशिमासारखा अणुबॉम्ब टाकल्यास एका आठवड्यात 8 लाख 70 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू होईल. याशिवाय पृथ्वीचं तापमान प्रचंड वाढेल. हवामानात बदल झाल्यानं माणसांचं आरोग्य धोक्यात येईल. शेतीचंही प्रचंड नुकसान होईल.