Russia-Ukraine War: घोडचूक! रशियाकडून स्वत:च्याच शहरावर हल्ला; स्फोटामुळं हाहाकार!
Russia-Ukraine War: गेल्या कैक दिवसांपासून सुरु असणाऱं आणि दिवसागणिक आणखी धुमसणारं रशिया- युक्रेन युद्ध काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये. यामध्ये सर्वाधिक अडचणींचा सामना करावा लागत आहे तो म्हणजे देशाच्या नागरिकांना.
Russian Warplane Attack: जवळपास वर्षभराहून अधिक काळापासून सुरु असणारं रशिया- युक्रेन युद्ध अद्यापही शमलेलं नाही. युद्धाची ठिणगी पडली त्या क्षणापासून सुरु असणारे हल्ले, प्रतीहल्ले आणि देशाची होणारी हानी अद्यापही थांबलेली नाही. त्यातच आता म्हणे युक्रेनला सातत्यानं निशाण्यावर घेणाऱ्या रशियाकडून एक मोठी चूक झाली आहे. ज्यामुळं देशातील नागरिकांना भयंकर परिस्थितीचा सामान करावा लागत आहे.
एका (Russian Fighter Jet) रशियन लढाऊ विमानानं चुकून स्वत:च्याच देशातील शहरावर बॉम्ब हल्ला केला आहे. ज्यामुळं मोठा स्फोट झाला असून, विचारही करता येणार नाही इतकं नुकसान झालं आहे. सदरील परिस्थितीमुळं रशियातील बेलगोरोड (Belgorod) या शहरात हाहाकार माजला आहे.
युक्रेनच्या सीमेनजीक आहे हे शहर... (Ukraine Border)
सूत्रांच्या माहितीनुसार रशियातील हे शहर युक्रेनच्या सीमेनजीक आहे. इथं रशियन सैन्यानं चुकून बॉम्ब हल्ला केला आणि यामध्ये शहरातील बऱ्याच इमारतींचं नुकसान झालं. काही नागरिक गंभीररिच्या जखमी झाले. हल्याची माहिती मिळताच तिथं शहरातील महत्त्वाचे अधिकारी तातडीनं पोहोचले आणि त्यांनी हल्ल्यामुळं झालेल्या नुकसानाची पाहणी केली. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवादही साधल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, अद्यापही हल्ल्याचा सविस्तर तपशील समोर आला नसून, इतकी मोठी चूक झालीच कशी? या प्रश्नाचं उत्तरही समोर आलेलं नाही.
वायुदलानं हे काय केलं?
रशियन वायुदलात असणारं सुखोई Su-34 हे लढाऊ विमान बेलगोरोड शहरावरून जात होतं. त्याचवेळी स्फोटकं अनावधानानं खाली पडली आणि हा हल्ला झाला अशी प्राथमिक माहिती माध्यमांच्या हाती आली आहे. हा स्फोट इतका भीषण होता की यामुळं शहरातील मुख्य रस्त्यावर 20 मीटर खोल खड्डा पडला. बऱ्याच इमारतींच्या काचाही फुटल्या.
हेसुद्धा वाचा : Twitter नं Blue Tick हटवली; योगी आदित्यनाथांपासून बिग बी, विराटपर्यंत नेत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना फटका
युद्ध इथले थांबत नाही...
24 फेब्रुवारी 2022 पासून रशिया आणि युक्रेन या दोन्ही राष्ट्रांमध्ये युद्धाची ठिणगी पडली, तिचा वणवाही झाला. त्याची तीव्रता दरम्यानच्या काळात कमी झाली असली तरीही अजून ही ठिणगी सातत्यानं धुमसताना दिसत आहे. त्यातच रशियाकडून युक्रेनवर होणाऱ्या हल्ल्यांचं प्रमाणही वाढताना दिसत आहे. या युद्धाचे जागतिक अर्थव्यवस्थेवरही थेट परिणाम झाले आहेत.