मास्को : Russia Ukraine War :  रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आज 14 वा दिवस आहे. दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरूच असून रशियन हल्ल्यानंतर युक्रेनमधील परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्यावेळी (Ukraine Russia War Updates) रशियाने एअर स्ट्राईक केला. युक्रेनच्या सुमी भागात हवाई हल्ला चढविण्यात आला. या हल्ल्यात 22 नागरिक ठार झाले आहेत. (Russia Ukraine War : Death toll from Russian airstrikes on Ukrainian city of Sumy rises to 22)


युद्धात 2 लाख लोकांनी देश सोडला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत, सुमारे दोन लाखांपेक्षा जास्त लोकांनी पूर्व युरोपीय देश सोडला आहे, ज्यापैकी निम्मी मुले आहेत. युक्रेनचे अनेक लोक निर्वासीत म्हणून दुसऱ्या देशात गेले आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतरचे युरोपमधील सर्वात मोठे स्थलांतर आहे. आता निर्वासितांचे संकट वाढत आहे. मारियुपोलसह रशियन सैन्याने वेढलेल्या युक्रेनियन शहरांमध्ये मानवतावादी परिस्थिती बिघडली आहे. अनेक ठिकाणी मृतदेह रस्त्यावर दिसून येत आहेत. अद्याप मानवतावादीदृष्टीकोणातून मदत पोहोचलेली नाही. 


सुमी भागात हवाई हल्ला, 22 ठार


रशियाने सुमीच्या निवासी भागांवर हवाई हल्ला चढवला आहे. युक्रेनमधील सुमी येथे रशियाने केलेल्या हवाई हल्ल्यात 22 जण ठार झाले आहेत. हल्ल्यानंतर सुदैवाने 2 मुलांसह 5 जणांचे प्राण वाचले. 


कीवच्या आसपास हवाई हल्ल्याचा इशारा


रशियाकडून युक्रेनची राजधानी कीववर सातत्याने हल्ले सुरुच आहेत. आता हवाई हल्ल्याबाबत पुन्हा एकदा इशारा देण्यात आला आहे. कीव आणि आसपासच्या भागात हवाई हल्ल्याचा इशारा देण्यात आला असून, सर्वांना लवकरात लवकर बंकरमध्ये जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पाबाबत मोठा खुलासा


दरम्यान, रशियन सैनिकांनी आण्विक संयंत्रातून महत्त्वाची उपकरणे काढून घेतल्याचे वृत्त आहे. इंटरनॅशनल अ‍ॅटोमिक एनर्जी एजन्सीचे प्रमुख राफेल ग्रोसी यांनी युक्रेनच्या चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पाबाबत मोठा खुलासा केला आहे. युद्धाच्या संकटात यापुढे अणुऊर्जा प्रकल्पातून धोकादायक किरणोत्सर्गावर लक्ष ठेवता येणार नाही, असे म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, रशियन सैन्याने हल्ल्यानंतर चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पातून काही महत्त्वाची उपकरणे काढून टाकली आहेत, ज्याद्वारे किरणोत्सर्गी कचऱ्यामध्ये आण्विक सामग्रीचे निरीक्षण केले जात होते.