Russia Ukraine War: पुतिनच्या ट्रॅपमध्ये असे अडकले झेलेन्स्की, रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात वीज यंत्रणा ठप्प, युक्रेन अंधारात
Russia Ukraine Crisis: रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबलेले नाही. रशियाकडून पुन्हा जोरदार हल्ले चढविण्यात आले आहेत. या हल्ल्यानंतर युक्रेनमधील वीज यंत्रणा ठप्प पडली असून युक्रेन पूर्णत: अंधारात गेला आहे.
Russia Ukraine Conflict: रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध अद्याप सुरुच आहे. या युद्धात गेल्या आठवड्यात एक मोठी घटना घडली. युक्रेनची राजधानी कीवसह इतर शहरांमध्ये वीजपुरवठा ठप्प झाला आहे. या समस्येतून बाहेर पडण्यासाठी युक्रेनने युरोपीय देशांची मदत मागितली आहे. रशियाने 15 नोव्हेंबर रोजी युक्रेनवर 100 हून अधिक क्षेपणास्त्र हल्ले केल्याने वीज यंत्रणा ठप्प पडली असून युक्रेन देश अंधारात आहे.
युक्रेन आणि रशियातील युद्ध अनेक महिने सुरु राहिल्याने जगातील बहुतेक देश आणि लोकांनी या घटनेला रशियाचा पराभव म्हणून पाहिले. खुद्द युक्रेननेही हा विजय मानून आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली होती. मात्र, पुतीन यांच्या मनात काही वेगळेच सुरु होते. रशियाने युक्रेनमध्ये दोन पावले मागे घेतली आणि इतक्या वेगाने हल्ला केला की युक्रेन आतापर्यंतच्या सर्वात वाईट स्थितीत पोहोचला आहे. (अधिक वाचा - Russia-Ukraine War: रस्त्यावरुन कार जात असताना अचानक पडलं क्षेपणास्त्र, व्हिडिओ पाहिल्यावर बसेल मोठा धक्का)
युक्रेनच्या खेरसन शहरातून माघार घेण्याचा निर्णय आणि...
गेल्या आठवड्यात रशियन सैन्याने युक्रेनच्या खेरसन शहरातून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. पुतीन यांच्या या रणनीतीत युक्रेन अडकले आणि आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. यानंतर रशियाने 15 नोव्हेंबर रोजी युक्रेनवर 100 हून अधिक क्षेपणास्त्र हल्ले केले. या हल्ल्यामुळे युक्रेनमधील अर्ध्याहून अधिक पॉवर ग्रीड उद्ध्वस्त झाले असून युक्रेनची राजधानी कीवसह इतर शहरांमध्ये वीजपुरवठा ठप्प झाला असून अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.
रशियन सैन्याने मास्टर स्ट्रोक खेळत युक्रेनच्या राजधानीसह अनेक शहरांवर एकूण 100 क्षेपणास्त्रे डागली. त्यामुळे येथील सुमारे 60 टक्के पॉवर ग्रीडचे नुकसान झाले आहे. वीज ग्रीड खराब झाल्याने बहुतांश शहरे अंधारात बुडाली आहेत. त्याचवेळी, युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाने या हल्ल्यांचे वर्णन 'पराभूत भ्याडांची बालिश रणनीती' असे केले आहे.
बॅरेज उद्ध्वस्त, 4 जण ठार झालेचे वृत्त
मिळालेल्या माहितीनुसार, 15 नोव्हेंबर रोजी रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात केवळ पॉवर ग्रीडच नाही तर एक मोठा बॅरेज देखील नष्ट झाला आहे. वीजनिर्मितीच्या दृष्टीने हा बॅरेज अत्यंत महत्त्वाचा होता. याशिवाय अनेक इमारतींचेही नुकसान झाले आहे. या हल्ल्यांमध्ये 4 जणांचा मृत्यू आणि 5 जण जखमी झाल्याचे वृत्त हाती आले आहे.
युक्रेनची युरोपीय देशांकडे मदत
रशियाच्या ताज्या हल्ल्यांनंतर, युक्रेनचे पंतप्रधान डेनिस श्मीगल यांनी आपल्या युरोपियन मित्र राष्ट्रांकडून मदत मागितली आहे. ते म्हणाले, 15 नोव्हेंबर रोजी रशियाने आमच्या वेगवेगळ्या शहरांवर 100 हून अधिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. त्यामुळे आपली अर्धी वीज यंत्रणा ठप्प झाली आहे. या हल्ल्यांमध्ये नुकसान झालेल्या पॉवर ग्रीडची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. यासाठी आम्हाला मदत हवी आहे.