भारतातून दरवर्षी हजारो, लाखो लोक नोकरीच्या निमित्ताने परदेशात जातात. भारतीयांना रोजगार देणाऱ्या देशांमध्ये सौदी अरेबियाचाur समावेश असून, तिथे मोठ्या संख्येने भारतीय वास्तव्यास आहेत. सौदी अरेबियात कौशल्य कामगारांची मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने अनेक भारतीय तिथे जातात. पण आता सौदी अरेबियाने विदेशी कामगारांसंबंधी एका नियमात बदल केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सौदीच्या मानव संसाधन आणि सामाजिक विकास मंत्रालयानुसार, नव्या नियमांतर्गत सौदी अरेबियाच्या अविवाहित पुरुष आणि महिलांना आता विदेशी कामगारांची भरती करणं महागात पडणार आहे. आता कोणत्याही अविवाहित सौदी नागरिकाला वयाची 24 वर्षं पूर्ण केल्यानंतरच घरगुती कामासाठी एखाद्या विदेशी नागरिकाला नियुक्त करता येणार आहे. 


सौदी अरेबियाचा हा निर्णय भारतासाठी महत्त्वाचा आहे कारण दरवर्षी मोठ्या संख्येने भारतीय काम करण्यासाठी तिथे जातात. भारतीय परराष्ट्र मंत्रालयानुसार, जवळपास 26 लाख भारतीय सौदी अरेबियात काम करतात. दरम्यान, आता भारतीयांसह इतरही विदेशी कामगार 24 पेक्षा कमी वय असणाऱ्या अविवाहित नागरिकांच्या घऱी मोलकरीण, नोकर किंवा इतर काम करु शकणार नाही. 


रिपोर्टनुसार, सौदी अरेबियाने देशांतर्गत कामगार बाजार सुव्यवस्थित आणि नियमन करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. सौदीच्या मानव संसाधन मंत्रालयाने ग्राहकांसाठी Musaned प्लॅटफॉर्म देखील स्थापित केला आहे. जिथे त्यांचे अधिकार, कर्तव्यं आणि संबंधित कामांची माहिती दिली जाईल. या व्यासपीठाच्या माध्यमातूनच कामगारांना व्हिसा देण्याची आणि कामगारांमध्ये वाटाघाटी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.


याशिवाय, STC Pay आणि Urpay द्वारे कामगारांना पगार हस्तांतरित करण्याची सुविधा Musaned प्लॅटफॉर्मवरच प्रदान करण्यात आली आहे. घरगुती कामगार करारांचे प्रमाणीकरण आणि विवादांवर तोडगा यांसारख्या सुविधा देखील आहेत. म्हणजेच, हे व्यासपीठ सौदी अरेबियामध्ये घरगुती कामगारांच्या भरतीसाठी अधिकृत व्यासपीठ असेल. त्याचा उद्देश भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणणं तसंच मालक आणि कामगार यांच्यातील कोणत्याही प्रकारचे वाद सोडवणे आणि दोघांचे हक्क सुनिश्चित करणे आहे.


सौदी अरेबियात घरगुती कामगारांच्या विविध श्रेणी आहेत. यामध्ये नोकर, चालक, सफाई कामगार, स्वयंपाकी, सुरक्षा कर्मचारी, शेतकरी, शिंपी, लिव्ह-इन नर्स आणि शिकवणी घेणारे यांचा समावेश आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने भारतीय नोकरीसाठी सौदी अरेबियात जातात. सौदी अरेबियामध्ये सुमारे 26 लाख भारतीय काम करतात.