फ्रान्समध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर, एका दिवसात 60,486 रुग्णांची वाढ
फ्रान्समध्ये कोरोनाचा वाढता कहर पाहता आधीच लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.
पॅरिस : फ्रान्समधील कोरोनाची दुसरी लाट कहर करत आहे. लॉकडाऊन असूनही, एका दिवसात 60,486 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. फ्रान्समध्ये लोकांनी विनाकारण लोकांनी घराबाहेर पडू नये म्हणून पोलिसांनी गस्त वाढवली आहे.
लॉकडाऊन जाहीर
फ्रान्स हा कोरोनाची दुसरी लाट आल्याने लॉकडाऊन करणारा युरोपमधील पहिला देश आहे. सरकारने लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. फ्रान्समध्ये लोकं विनाकारण बाहेर पडू नये म्हणून पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. पोलिसांकडून वाहनाची कसून चौकशी केली जात आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांना घराबाहेर पडण्याची परवानगी आहे.
एका दिवसात 60,486 रुग्ण
फ्रान्समध्ये एका दिवसात 60,486 नवीन रुग्ण वाढले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाने म्हटलं की, आता संक्रमित लोकांची संख्या 17 लाखांवर गेली आहे. एका दिवसापूर्वी येथे कोरोनाचे 58 हजार रुग्ण वाढले होते. आतापर्यंत 39,916 लोकांचा मृत्यू झाला आहे.
विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या लोकांकडून पोलीस दंड वसूल करत आहेत. ज्यामध्ये पहिल्यांदा 135 युरो आणि जे 15 दिवसांच्या आत पुन्हा बाहेर पडले तर त्यांच्याकडून दोनशे युरो दंड आकारला जात आहे. एका महिन्यात तिसऱ्यांदा बाहेर पडल्यास त्याला 3 हजार 750 युरो दंड आणि सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली जाऊ शकते.
3 दिवसांत रोज 50 हजार रुग्णांची भर
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, फ्रान्समध्ये गेल्या तीन दिवसांत दररोज कोरोनाचे 50 हजारांहून अधिक रुग्ण वाढत आहेत. अशा परिस्थितीत लोकांनी शक्यतो घरात रहावे यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.