Pakistan PM : इम्रान खान यांना धक्का, पाकिस्तानात पुन्हा `शरीफ`राज; शेहबाज शरीफ नवे पंतप्रधान
Pakistan PM Shehbaz Sharif : पाकिस्तानमधील राजकीय घडामोडींना वेग आला असून शहबाद शरीफ पुन्हा पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाच्या गादीवर विराजमान झाले आहेत.
Pakistan New Prime Minister : पाकिस्तानमध्ये झालेल्या पंतप्रधानपदासाठीच्या निवडणुकीत शेहबाद शरीफ (Shehbaz Sharif) यांनी बाजी मारल्याची माहिती समोर आली आहे. शेहबाद शरीफ यांनी पीटीआयच्या उमर अयुब खान यांचा पराभव केला. शेहबाद शरीफ यांना 201 मतं मिळाली अन् त्यांनी 92 मतं मिळालेल्या उमर अयुब खान (Umar Ayub Khan) यांचा पराभव करत निवडणूक जिंकली आहे. पाकिस्तानमध्ये झालेल्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं. इम्रान खान यांच्या समर्थनात उभ्या राहिलेल्या उमेदवारांना सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. मात्र, पीएमएल-एन आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीने युती सरकार स्थापन करण्यावर सहमती दर्शवली अन् इम्रान खान यांना मोठा धक्का बसला.
पीएमएल-एन आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीने युती केल्याने शहबाज शरीफ यांचा पंतप्रधान होण्याचा पर्याय खुला झाला होता. मात्र, दुसरीकडे इम्रान खान यांच्या समर्थनाने उमर अयुब खान यांनी देखील पंतप्रधानपदाचा अर्ज दाखल केला. त्यामुळे सभापती अयाज सादिक यांनी मतदान घेण्याचा कौल दिला. मतदान झाल्यावर शेहबाद शरीफ यांना 201 मतं मिळाली. तर उमर अयुब खान यांना फक्त 92 मतांवर समाधानी रहावं लागलं. त्यामुळे आता येत्या सोमवारी शेहबाद शरीफ पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.
नवाझ शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाजला (पीएमएल-एन) 75 जागा मिळाल्या. बिलावल झरदारी भुट्टो यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीला 54 जागा मिळाल्या. मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट पाकिस्तान (MQM-P) ला 17 जागा मिळाल्या. उर्वरित 12 जागा इतर छोट्या पक्षांनी जिंकल्या. सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला 265 पैकी 133 जागा जिंकाव्या लागतात.
दरम्यान, पाकिस्तानमध्ये 8 फेब्रुवारी रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदानप्रक्रिया पार पडली. 266 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून तब्बल 5 हजार 121 उमेदवार यावेळी रिंगणात होते. तर जवळपास 12 कोटी लोकांनी यावेळी मतदानाचा हक्क बजावला होता. पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीच्या एकूण 336 जागा आहेत. त्यापैकी 265 जागांवर निवडणूक झाली. उर्वरित 10 जागा राखीव आहेत. पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन), पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) यांच्यात लढत होती.