वॉशिंग्टन : कोरोना व्हायरसवरून सुरु झालेल्या वादानंतर अमेरिका आणि चीन यांच्यातले संबंध आणखी ताणले गेले आहेत. ७२ तासांमध्ये चीनने अमेरिकेच्या हॉस्टन सिटीमधला दूतावास बंद करावा, असा इशारा अमेरिकेने दिला आहे. अमेरिकेचं हे वर्तन चुकीचं असून, या निर्णयाविरोधात योग्य प्रतिक्रिया दिली जाईल, असं सूचक विधान चीनकडून करण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना व्हायरसवरून या दोन्ही देशातले संबंध बिघडले. यानंतर दक्षिण चीन समुद्राचा वाद, हाँगकाँग सुरक्षा विधेयक, अमेरिकेने तायवानला विकलेली शस्त्रं, शिंगजियांगमधल्या अल्पसंख्याकांची परिस्थिती या मुद्द्यांवरूनही चीन आणि अमेरिकेत गेल्या काही दिवसांमध्ये तणाव वाढला आहे. आता त्यामध्ये दूतावास बंद करण्याची भर पडली आहे. 


डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयावर चीनच्या परराष्ट्र मंत्रालययाने टीका केली आहे. अमेरिकेने उचललेलं हे पाऊल म्हणजे आंतरराष्ट्रीय कायदे, आंतरराष्ट्रीय संबंध आणि चीन-अमेरिकेमध्ये झालेल्या करारांचं उल्लंघन आहे. चीन याचा कठोर शब्दांमध्ये निषेध करते. अमेरिकेने तात्काळ हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा चीन आवश्यक ती सर्व पावलं उचलेल, असा इशारा चीनने अमेरिकेला दिला आहे.


'गेल्या काही दिवसांपासून चीनला वारंवार लक्ष केलं जात आहे. अमेरिकेत चीनच्या दूतावासामध्ये काम करणाऱ्यांना त्रास दिला जात आहे. चीनमधल्या विद्यार्थ्यांना डांबून त्यांची चौकशी केली जात आहे. या विद्यार्थ्यांच्या हातातून त्यांच्या इलेक्ट्रिकल वस्तू काढून घेतल्या जात आहेत,' असा आरोप चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी केला आहे. 


त्याआधी अमेरिकेतल्या चीनच्या दूतावासात कागदपत्र जाळली जात असल्याची माहिती तिथल्या स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाला मिळाली होती. हॉस्टनमधील चीनी दूतावास १९७९ मध्ये सुरू करण्यात आला होता.