Mary Millben On Why She Touches PM Modi Feet: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Modi) अमेरिकी दौऱ्यादरम्यान प्रवासी भारतीयांच्या कार्यक्रमात भारतीय राष्ट्रगीत सादर करणारी अमेरिकन गायिका मॅरी मिलबेनची (Mary Millben) सध्या सगळीकडे चर्चा आहे. भारतीय राष्ट्रगीत सादर केल्यानंतर मॅरी स्टेजवरच पंतप्रधान मोदींच्या पाया पडल्या. हा क्षण कॅमेरात कैद झाला आणि तो जगभरात व्हायरल झाला. मात्र आता मॅरी यांनी पंतप्रधान मोदींच्या पाया पडण्यामागील कारण सांगितलं आहे. पंतप्रधान मोदी हे किती महान नेते आहेत हे मला अधोरेखित करायचं होतं. पंतप्रधान मोदी हे भारताचं एक सुंदर स्वप्न आहे. त्यांच्याबद्दल माझ्या मनात फार सन्मान आणि श्रद्धा आहे, असं मॅरी यांनी सांगितलं आहे.


मोदी फारच खास आहेत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"फार ईमानदारीने सांगायचं झालं तरही मी अवाक आहे. मला विश्वास बसत नव्हता की मी खरंच पंतप्रधान मोदींच्या बाजूला उभी राहून गात होते. मला त्यांच्याबद्दल फार आदर आणि सन्मान वाटतो. गायिका म्हणून माझ्या करिअरमधील हा क्षण मुख्य आकर्षणाचा होता असंही मी म्हणेन. ते फार खास व्यक्ती आहेत. ते फार दयाळू, प्रेम आणि विनम्र आहेत. भारत त्यांच्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे, देशाबद्दल त्यांना काय वाटतं हे सर्वांना ठाऊक आहे," असंही मॅरी यांनी म्हटलं.


अनेकदा भारतीय परंपरांबद्दल केली चर्चा


"मी निश्चितपणे माझे हिंदीचे शिक्षक डॉ. मोक्षराज यांचे आभार मानू इच्छिते. ते केवळ माझे हिंदीचे शिक्षक नसून त्यांनी अनेक वर्ष वॉशिंग्टन डीसीमधील भारतीय दूतावासामध्ये संस्कृतिक राजकीय अधिकारी म्हणून काम केलं आहे. मी त्यांच्याबरोबर भारतीय परंपरा आणि मूल्यांबद्दल अनेकदा त्यांच्याशी चर्चा केली आहे," असंही मॅरी यांनी सांगितलं. यावरुनच भारतीय संस्कृतीमध्ये ज्येष्ठ व्यक्तींच्या पाया पडतात याची कल्पना मॅरी यांना असल्याचं दिसून येतं. "पंतप्रधान मोदी हे भारतीय स्वप्नांचं प्रतिक आहे. अगदी अमेरिकन ड्रीम म्हणतात तसाच हा प्रकार आहे," असंही मॅरी यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं. 



मला सार्वजनिक स्तरावर सन्मान दाखवायचा होता


मी काही वेळ पंतप्रधान मोदींबरोबर मंच शेअर करणार होते. सार्वजनिक कार्यक्रमात मला त्यांच्याबद्दल वाटणारा आदर दाखवायचा होता. ही एक परंपरा आहे. पाया पडणं ही एक भारतीय परंपरा आहे. केवळ मनात आदरभाव न ठेवता तो व्यक्त करण्याची ही एक पद्धत आहे. मी जेवढं शिकलेय त्यावरुन ज्येष्ठ व्यक्तींच्या पाया पडणं म्हणजे त्यांच्या हृदयाला हात घालण्यासारखं असतं. त्यामुळेच जेव्हा तुम्ही वयाने मोठ्या व्यक्तींच्या पाया पडता तेव्हा त्यांच्याबद्दल वाटणारा सन्मान आणि प्रेम तुम्ही व्यक्त करत असता. माझ्या मनात मोदींबद्दल एवढी श्रद्धा आणि सन्मान आहे हे मी सार्वजनिक पद्धतीने दाखवू इच्छत होते. त्यामधूनच मी त्यांच्या पाया पडले. त्यांच्या पाया पडण्याचा माझा निर्णय योग्य होता. त्यामुळे मला फार समाधान मिळालं, असं मॅरी यांनी सांगितलं.