Migrant Boat News : सागरी मार्गानं प्रवास करताना अनेक दुर्घटना घडल्याचं संपूर्ण जगानं पाहिलं आहे. यात आता आणखी एक भर पडण्याची शक्यता आहे. कारण ठरतंय ते म्हणजे स्पेनमधील एक घटना. 'रॉयटर्स'नं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार जवळपास 300 स्थलांतरितांना समुद्र मार्गानं सेनेगलहून स्पेनच्या कॅनरी आयलंड येथे नेणारी तीन जहाजं अचानक बेपत्ता झाली आणि त्यात असणाऱे 300 स्थलांतरितही बेपत्ता असल्याचं वृत्त समोर आलं.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Walking Borders च्या हेलेना मलेनो यांनी 'रॉयटर्स'ला दिलेल्या माहितीनुसार 65 आणि 50 ते 60 जणांना घेऊन निघालेल्या दोन नौका सेनेगलहून निघाल्यापासून गेले 15 दिवस बेपत्ता होती. 27 जून रोजी 200 स्थलांतरितांना घेऊन तिसरी नौकाही त्याच मार्गानं निघाली. ज्यातून प्रवास करणाऱ्यांच्या कुटुंबीयांनाही अद्याप त्यांच्याशी कोणताही संपर्क साधता आलेला नसल्याची बाब लक्षात येताच चिंता वाढली. 


BBC च्या वृत्तानुसार स्थलांतरितांच्या नौका बेपत्ता झाल्याचं कळताच बचावकार्य हाती घेण्यात आलं आणि या नौकांचा शोध सुरु झाला. या शोधकार्यात 86 जण सापडलेसुद्धा. प्रथमत: हे प्रवासी 'त्या' बेपत्ता नौकांमधील स्थलांतरित आहेत असं लक्षात आलं पण, ही एक वेगळीच नौका होती ज्याची माहिती त्यांच्याकडे उपलब्ध नव्हती. परिणामी अद्यापही 'ते' 300 स्थलांतरित बेपत्ताच असल्याचं निष्पन्न होतं. त्यांच्या या प्रवासादरम्यान नेमकं काय घडलं, ते कुठे आहेत? असेच अनेक प्रश्न आता उपस्थित होताना दिसत आहेत. 


नौकांचा प्रवास सुरु झाला खरा... 


दक्षिण सेनेगलपाशी असणाऱ्या Kafountine येथून कॅनरी आयलंडपासून साधारण 1,700 किमी (1,057 मैल) अंतरावरून निघाल्या होत्या. पण, आता मात्र त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकत नसल्यामुळं त्या नौकांमधून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांच्या कुटुंबीयांनी चिंतेचा सूर आळवला आहे. सेनेगसमध्ये असणाऱ्या अस्थैर्यामुळं तेथील एकाच भागातून हे 300 जण स्पेनच्या कॅनरी आयलंडच्या दिशेनं निघाले खरे. पण, त्यांचा हा प्रवास त्यांना नेमका कुठं घेऊन गेलाय हे अद्याप कळू शकलेलं नाही. 


हेसुद्धा वाचा : स्वत:च्या लग्नाला पोहचण्याआधीच नवरदेवानं विमानातून मारली उडी; Video तुफान व्हायरल


स्पेनपर्यंत पोहोचण्यासाठी कॅनरी बेटांचा किनारा स्थलांतरितांसाठी एक महत्त्वाचं ठिकाण ठरत असून, इथून अनेकजण स्पेनपर्यंत जाण्याचा मार्ग निवडतात. सहसा या सागरी मार्गानं प्रवास करण्यासाठी इथं उन्हाळी दिवस निवडले जातात. तज्ज्ञांच्या मते  Atlantic migration ची ही वाट अतिशय आव्हानात्मक असून, त्याचा सर्वाधिक वापर Saharan Africa येथील स्थलांतरितांकडून केला जातो. 


संयुक्त राष्ट्रांकडून स्थलांतरितांची नोंद ठेवणाऱ्या जागतिक संघटनेच्या माहितीनुसार 2022 मध्ये कॅनरी बेटांवर पोहोचण्याच्या प्रयत्नांत जवळपास 559 जणांचा मृत्यू ओढावला. ज्यामध्ये 22 लहान मुलांचाही समावेश होता. इथं आपण सुखद आयुष्य जगत असतानाच जगाच्या एका कोपऱ्यात मात्र आयुष्याची वेगळीच खेळी सुरु असल्याचं दाहक वास्तव समोर आलं.