Wedding Video : लग्न... जीवनातील एक असा टप्पा जिथं आपण प्रत्येक क्षण मनमुराद जगत असतो. आयुष्यभरासाठी एका व्यक्तीचं आपल्या आयुष्यात येणं आणि कायमस्वरुपी आपलंच होऊन जाणं ही भावनाच मुळाच अतिशय सुरेख आहे. अशा या भावनेपोटी लग्नाचा दिवस अविस्मरणीय करण्यासाठीच अनेजण आणि त्याहूनही नवरदेव आणि नवरी उत्सुक असतात. त्यासाठी मग कल्पना लढवणं असो किंवा मग काही चौकटीबाहेरच्या गोष्टी आजमावणं असो, प्रयोगशीलतेचा प्राधान्य दिलं जातं.
लग्नाच्या दिवशी (Bride Groom) वधु-वराच्या पेहरावापासून विवाहस्थळी त्यांच्या प्रवेशापर्यंत सर्वकाही वेगळं आणि लक्षवेधी असायला हवं यासाठीही काही मंडळी आग्रही असतात. अशाच एका लग्नाळू नवरदेवानं चौकटीबाहेरची म्हणता म्हणता मंडपाच्याच काय, विचारांच्या कक्षांच्या बाहेरूनच लग्नासाठी ग्रँड एंट्री घेतली आणि सारं जग त्याच्या कृत्यानं हादरलं. कारण त्यानं लग्नाच्या दिवशी विमानातून उडी मारली...
लष्कराच्या सेवेतून निवृत्त झालेल्या क्रिस पार्क्स यांनी अफगाणिस्तानसोबतच्या संघर्षदरम्यान त्यांचे पाय गमावले होते. याच क्रिस यांनी त्यांच्या लग्नाच्या दिवशी Northumberland येथे असणाऱ्या Langley Castle येथे उंच आकाशात झेपावलेल्या विमानातून उडी मारली. यावेळी त्यांना सोबत दिली ती म्हणजे groomsmen अर्थात 9 खास मित्रांची.
34 वर्षीय क्रिस यांनी या खास दिवसासाठी त्यांच्या मित्रांसह 6 महिन्यांसाठी रितसर प्रशिक्षण घेतलं आणि लग्नाचा दिवस अविस्मरणीय केला. लग्न करण्याहून 'ही उडी मारणं अधिक तणावपूर्ण होतं', असं ते विनोदी अंदाजात म्हणाले आणि समोर उभ्या त्यांच्या सहचारिणीच्याही चेहऱ्यावर हसू उमटलं. लग्नासाठी आलेले पाहुणेही नवऱ्या मुलाची ही करामत पाहून हैराणही होते आणि त्याच्या साहसाचं कौतुकही करत होते.
क्रिस यांची पत्नी Pippa सुद्धा एक स्कायडायव्हर असून, तिलाही आपल्या पतीनं केलेली ही किमया कमालच वाटली. लग्नासाठी मी एक 'फॅन्सी ड्रेस घेतला आणि त्यानं एक फॅन्सी डाईव्ह मारली' असं म्हणत तिनंही क्रिसला दाद दिली. एका लग्नाची ही आगळीवेगळी आणि तितकीच रंजक गोष्ट नकळतच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आणत आहे. इथं खऱ्या अर्थानं Love is in the Air होतं असंच म्हणावं लागेल, नाही का?