कोलंबो :  श्रीलंकेत आणीबाणी (Sri Lanka Economics Crisis) लागू झालीय. श्रीलंकेतली जनता प्रचंड पेटून उठलीय. तिथल्या नागरिकांनी आज पंतप्रधानांच्या घरावरच हल्ला केला. त्यामुळे लंकेत जनता विरुद्ध लष्कर असा संघर्ष पेटलाय. पाहुया थेट श्रीलंकेतून झी २४ तासचा स्पेशल रिपोर्ट. (sri lanka economics crisis emergency apply in country)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंकेतला हा प्रचंड उद्रेक. ही दृश्यं श्रीलंकेची राजधानी कोलंबोमधली. आंदोलकांनी राष्ट्रपतींच्या घरावर हल्लाबोल केला. जो तो राष्ट्रपती भवनात घुसण्याचा प्रयत्न करत होता. जमाव नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात सैन्य रस्त्यावर उतरवलं गेलं आणि मग सुरू झाली धुमश्चक्री. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा मारा केला आणि मग जो तो वाट फुटेल तिथे पळू लागला. 


श्रीलंकेतलं राष्ट्रपतीभवन आणि पंतप्रधानांच्या घरावर आंदोलक कब्जा करतायत. श्रीलंकेत राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे देश सोडून पळून गेलेत. सध्या रानिल विक्रमसिंघेंना श्रीलंकेचे काळजीवाहू राष्ट्रपती बनवण्यात आलंय. गोटाबाया मालदीवमध्ये पळून गेल्याचं समजतंय. श्रीलंकेतल्या सरकारी टीव्ही चॅनलचं प्रसारण बंद करण्यात आलंय. 


गेले कित्येक महिने श्रीलंकेच्या अर्थकारणाची पुरती वाट लागलीय. महागाईनं जगणं मुश्कील झालंय. अशा परिस्थितीत नेते देश सोडून पळून जातायत. त्यामुळे जनतेचा मोठा उद्रेक झाला.


श्रीलंकेतली पेटलेली ही आंदोलनं नियंत्रणात आणण्यासाठी आता लष्करानं कंबर कसलीय. आंदोलनं सुरू असताना लष्कराची हेलिकॉप्टर्स घिरट्या घालू लागलीयत. हेलिकॉप्टरमधून आंदोलकांवर नजर ठेवली जातेय. ही अराजकता श्रीलंकेला कुठल्या दिशेला घेऊन जाणार, याचा आता काहीच नेम नाही. पेटलेल्या लंकेला या क्षणी गरज आहे ती स्थिर आणि आश्वासक नेतृत्वाची.