महागाईचा भडका : देशात बटाटा 200 रुपये किलो, 710 रुपये 1 KG मिरचीला भाव
Sri Lanka inflation : भारतात महागाईची भडका उडत असताना शेजारी देश श्रीलंका जवळपास दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे.
कोलंबो : Sri Lanka inflation : भारतात महागाईची भडका उडत असताना शेजारी देश श्रीलंका जवळपास दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, महागाई 11.1 टक्क्यांच्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. तेथे एक किलो बटाट्याचा भाव सुमारे 200 रुपयांवर पोहोचला आहे. याशिवाय एक किलो मिरचीचा भाव 710 रुपयांवर गेला आहे.
एकीकडे दिवाळखोरी तर दुसरीकडे प्रचंड महागाई अशा स्थितीत श्रीलंका सध्या गंभीर आर्थिक आणि मानवतावादी संकटाचा सामना करत आहे. श्रीलंका जवळपास दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. महागाई 11.1 टक्क्यांच्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. एवढेच नाही तर तेथील जनता महागाईचा चटका सोसत आहे. श्रीलंकेच्या अॅडव्होकाटा इन्स्टिट्यूटने चलनवाढीचा डेटा जारी केला आहे, ज्यामध्ये एका महिन्यात खाद्यपदार्थांच्या किमती 15 टक्क्यांनी वाढल्याचं सांगण्यात आलं आहे.
श्रीलंकेत राष्ट्रीय आर्थिक आणीबाणी जाहीर
दरम्यान, गेल्या वर्षी 30 ऑगस्ट रोजी श्रीलंकेतील चलन मूल्यात तीव्र घसरण झाल्यानंतर श्रीलंकन सरकारने राष्ट्रीय आर्थिक आणीबाणी घोषित केली. त्यानंतर अन्नधान्याच्या किमतीत मोठी वाढ झाली. चीनसह अनेक देशांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यात श्रीलंकेला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
एका महिन्यात महागाई 15 टक्क्यांनी वाढली
अॅडव्होकाटा इन्स्टिट्यूटने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबर 2021 ते डिसेंबर 2021 दरम्यान श्रीलंकेतील खाद्यपदार्थांची महागाई 15 टक्क्यांनी वाढली आहे. श्रीलंकेत 100 ग्रॅम मिरचीची किंमत 18 रुपये होती, ती आता 71 रुपये झाली आहे. म्हणजेच एक किलो मिरचीचा भाव 710 रुपयांवर गेला आहे. मिरचीच्या भावात एकाच महिन्यात 287 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
1 किलो बटाट्याचा भाव 200 रुपयांवर
याशिवाय वांग्याच्या दरात ५१ टक्के, तर कांद्याच्या भावात ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. आयातीअभावी येथे लोकांना दुधाची पावडरही मिळत नाही. त्यामुळे एक किलो बटाट्याचा भाव 200 रुपयांच्या आसपास पोहोचला आहे.
इतर भाज्यांचे दर
टोमॅटो - 200 रुपये/किलो
वांगी - 160 रुपये/किलो
भेंडी - 200 रुपये/किलो
कारला - 160 रुपये/किलो
बीन्स- 320 रुपये/किलो
कोबी - 240 रुपये/किलो
गाजर - 200 रुपये/किलो
कच्ची केळी - 120 रुपये/किलो
श्रीलंकेला दुहेरी पराभवाचा सामना
कोलंबो गॅझेटमधील एका अहवालानुसार, गेल्या दशकात श्रीलंकेला दुहेरी नुकसान सहन करावे लागले आहे. एक म्हणजे वित्तीय तूट आणि दुसरी व्यवसाय तूट. 2014 पासून श्रीलंकेवरील विदेशी कर्जाची पातळीही सातत्याने वाढत आहे. 2019 मध्ये हे कर्ज देशाच्या जीडीपीच्या 42.6 टक्क्यांवर पोहोचले होते.