नवी दिल्ली : दिवसागणिक वाढती महागाई सर्वांच्याच नाकी नऊ आणताना दिसत आहे. घरगुती वापरातील गॅसच्या दरापासून ते अगदी घासावर पडणाऱ्या तुपापर्यंत सर्वकाही इतकं महागत आहे, की खायचं काय वारा? असाच प्रश्न सर्वसामान्य जनता विचारत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या जगातील एक देशात महागाईनं शिखर गाठलं आहे. हा देश आहे श्रीलंका. दैनंदिन वापरातील खाण्यापिण्याच्या गोष्टीही इथं प्रचंड महाग झाल्या आहेत. (Sri Lanka)


सूत्रांच्या माहितीनुसार श्रीलंकेत 400 ग्रॅम दुधासाठी 790 रुपये मोजावे लागत आहेत. तर 1 किलो तांदूळ इथं 500 रुपयांवर पोहोचले आहेत. देशात आलेली ही महागाईची लाट पाहता आता अनेकांनीच भारताची वाटही धरली आहे. 


श्रीलंकेतून भारतात आलेल्या शरणार्थींच्या सांगण्यानुसार देशात तांदूळ 500 रुपये किलो इतक्या दरानं विकला जात आहे. तर, साखरेचे दर 290 रुपये प्रति किलो इतके झाले आहेत. 


जाणकार आणि अभ्यासकांच्या माहितीनुसार परिस्थिती अशीच राहिल्यास 1989 नागरी युद्धाची परिस्थिती पुन्हा ओढावली जाऊ शकते. ज्यामुळं देशातून पलायन करणाऱ्यांची संख्या वाढल्याचं निरिक्षणात येत आहे. 


श्रीलंका ठरणार दिवाळखोर देश? 


चीनसोबत इचर राष्ट्रांच्या कर्जाचं ओझं असणाऱ्या श्रीलंकेला दिवाळखोर राष्ट्र घोषित करण्यात आता फार वेळ शिल्लक नाही. या राष्ट्राला पुढच्या 12 महिन्यांमध्ये  7.3 अब्ज डॉलर (जवळपास 54,000 करोड़ रुपये) घरगुती आणि परदेशी कर्ज फेडायचं आहे. यामध्ये जवळपास 68 टक्के भाग हा चीनचा असल्याचं कळत आहे. 


गंभीर आर्थिक संकटातून जाणाऱ्या श्रीलंकेसाठी भारतानं मदतीचा हात पुढे करत 90 कोटी डॉलर इतकं कर्ज देण्याची घोषणा केली आहे. 


का ओढावलं इतकं मोठं आर्थिक संकट ? 


श्रीलंकेमध्ये कोरोना काळात पर्यटन क्षेत्रावर याचे कमालीचे परिणाम दिसून आले. यासोबतच सरकारी खर्चात वाढ आणि करात कमतरता केल्यामुळं परिस्थिती आणखी बिघडली. 


चीनला श्रीलंकेकडून 5 अब्ज डॉलर इतकी गडेगंड रक्कम येणं आहे. तेव्हा आता श्रीलंका दिवाळखोरीतून बाहेर येण्यासाठी नेमकी कोणती वाट निवड़णार आणि देशातील नागरिकांना दिलासा केव्हा मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.