नवी दिल्ली : श्रीलंकेत आजपासून 10 तासांची वीज कपात सुरू झाली आहे. बाजारात मेणबत्त्याही उपलब्ध नसल्याने लोकांना अंधारात राहण्याशिवाय पर्याय नाही. जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा सुरूच असून, महागाईने ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंकेत आतापर्यंतची सर्वात मोठी वीज कपात सुरू झालीये. स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात वाईट आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेने बुधवारपासून दररोज 10 तास वीज कपात सुरू केली आहे. देशात पेट्रोलियम इंधनाची तीव्र टंचाई आहे, त्यामुळे विजेचे उत्पादन लक्षणीयरीत्या घटले आहे. देशात खाण्यापिण्याच्या सर्व जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला असून, त्यामुळे संतप्त नागरिक गोटाबाया राजपक्षे सरकारवर संताप व्यक्त करीत आहेत.


औषधांची दुकाने आणि रुग्णालयांचीही हीच स्थिती आहे. देशात औषधांच्या तुटवड्यामुळे शस्त्रक्रिया बंद पडत आहेत. त्यामुळे अनेक रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. श्रीलंकेच्या वीज मंडळाने सांगितले की, महिन्याच्या सुरुवातीपासून सात तासांची वीज कपात केली जात होती ती आता 10 तासांवर आणली जात आहे कारण वीज निर्मितीसाठी कोणतेही इंधन उपलब्ध होत नाहीये.


वीज संकट अधिक गडद 


अधिकाऱ्यांनी सांगितले की, श्रीलंकेतील 40 टक्क्यांहून अधिक वीज जलविद्युतपासून निर्माण होते. इंधनाचा तुटवडा आहे, तसेच पावसाअभावी बहुतांश नद्या आणि जलाशयांमध्ये पाणी नाही, त्यामुळे वीजनिर्मिती करणे कठीण होत आहे.


श्रीलंकेतील बहुतांश वीजनिर्मिती कोळसा आणि पेट्रोलियम पदार्थांपासून होते. या दोन्ही गोष्टींसाठी श्रीलंका आयातीवर अवलंबून आहे. परंतु देशाचा परकीय चलनाचा साठा रिकामा झाला आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची आयात ठप्प झाली आहे.


सरकारी मालकीच्या किरकोळ इंधन विक्रेत्या सिलोन पेट्रोलियम कॉर्पोरेशनने (CPC) सांगितले की, देशात किमान दोन दिवस डिझेल नसेल.


CPC ने पेट्रोल स्टेशनवर लांबच लांब रांगा लावलेल्या नागरिकांना त्यांच्या घरी परत जाण्यास सांगितले आहे. इंधन पुरवठा झाल्यानंतर नागरिकांना सूचित करण्यात येणार आहे. वर्षाच्या सुरुवातीपासूनच पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. आतापर्यंत पेट्रोलच्या दरात 92 टक्के आणि डिझेलच्या दरात 76 टक्के वाढ झाली आहे.


स्वयंपाकाचा गॅस आणि रॉकेल खरेदी करण्यासाठी सरकारला पैसे जमा करण्यासाठी 12 दिवस लागले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सरकारने कसे तरी $44 दशलक्ष रक्कम जमा केली, त्यानंतर स्वयंपाकाचा गॅस आणि रॉकेलची सरकारने खरेदी केली.


श्रीलंकेवर प्रचंड विदेशी कर्ज आहे आणि त्यामुळे मार्च 2020 मध्ये त्यांनी जीवनावश्यक वस्तूंच्या आयातीवर बंदी घातली. श्रीलंकेला तेव्हा 51 अब्ज डॉलरचा विदेशी कर्जाचा हफ्ता भरला. त्यानंतर श्रीलंकेत सर्व अत्यावश्यक वस्तूंची कमतरता भासायला लागली. आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढल्या.


श्रीलंकेत सर्व जीवनावश्यक अन्नधान्य, औषधांचा तीव्र तुटवडा 


श्रीलंकेत तांदूळ, साखर, दूध अशा सर्व जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा आहे. उपलब्ध असलेल्या वस्तूंच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्यामुळे श्रीलंकेतही स्थलांतर सुरू झाले आहे. लोक आपला देश सोडून शेजारच्या भारतात येत आहेत. श्रीलंकेत अत्यावश्यक औषधे आणि आरोग्य सुविधांअभावी अनेक रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रिया थांबवण्यात आल्या आहेत.


श्रीलंकेच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलताना, 31 वर्षीय शिक्षिका वाणी सुजाई यांनी एका भारतीय वृत्तपत्राला सांगितले की, तिचा नवरा आखाती देशात राहतो आणि तिला जाण्याची संधी मिळाली तर ती नक्कीच श्रीलंका सोडेल. तिचे तीन सदस्यांचे कुटुंब एक महिन्यापूर्वी 30 हजार श्रीलंकन ​​रुपये खर्च करत होते पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे.


ती म्हणाली की, 'या महिन्यात मी 83 हजार रुपये खर्च करावे लागले. तरीही दुधाचा तुटवडा आहे. तांदूळ आणि डाळी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. वीजसुद्धा नसते आणि मेणबत्त्याही मिळेनाशा झाल्या आहेत. पॅरासिटामॉलच्या 10 ते 12 पानांच्या गोळ्यांसाठी 420 ते 450 रुपये मोजावे लागत असून अनेक औषधं अजिबात उपलब्ध नाहीत.  माझा पगार 55 हजार आहे आणि माझे पती जे पैसे पाठवतात त्यावरून आम्ही आमचा खर्च चालवू शकतो. पण वस्तूच मिळत नाही. पैसे खाऊन जगता येईल का?'