४ महिन्यांपासून कोमात असलेल्या तरुणीला गाण्यामुळे आली जाग
चीनमधील एका मुलीचा किस्सा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. एक मुलगी ४ महिन्यांपासून कोमामध्ये होती आणि असं काही झालं की ती पूर्णपणे बरी झाली.
बीजिंग : चीनमधील एका मुलीचा किस्सा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. एक मुलगी ४ महिन्यांपासून कोमामध्ये होती आणि असं काही झालं की ती पूर्णपणे बरी झाली. चीनी वृत्तपत्रांमध्ये छापलेल्या बातमीनुसार २४ वर्षीय तरुणी गेल्या ४ महिन्यांपासून कोमामध्ये होती. मात्र अचानक तैवानचा पॉपस्टार जे चाऊचे गाणे वाजू लागले आणि चमत्कार झाला. असे काही घडेल याची कोणी कल्पनाच केली नव्हती. गाणे वाजू लागले आणि मुलगी अचानक उठली.
दक्षिण चीन मॉर्निंग पोस्टच्या बातमीनुसार एक तरुणी गेल्या नोव्हेंबरपासून कोमामध्ये होती. तिचा मेंदू काम करत नव्हता. तरुणीला कोमातून बाहेर आणण्यासाठी रुग्णालया प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु होते. मात्र ती तरुणी कोणत्याच गोष्टीला प्रतिसाद देत नव्हती. मात्र जसे तिने पॉपस्टारचे गाणे ऐकले ती शुद्धीवर आली. हे गाणे एका नर्सच्या मोबाईलमध्ये वाजले. या नर्सने वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, ती नेहमी या पॉपस्टारचे गाणे ऐकत असे. त्यामुळे रुग्णांना पण आवडेल असे वाटल्याने ते गाणे लावत असे. याच गाण्याने चमत्कार घडवला आणि तरुणी शुद्धीत आली. हॉस्पिटलमधील स्टाफही या प्रकाराने हैराण झाला.