स्वित्झर्लंडमध्ये बुरखाबंदी, भारतातही होणार?
फ्रान्स, ऑस्ट्रिया, नेदरलँड, डेन्मार्क, बेल्जियमपाठोपाठ स्वित्झर्लंडमध्येही बुरखाबंदी
युरोपातील फ्रान्स, ऑस्ट्रिया, नेदरलँड, डेन्मार्क आणि बेल्जियमपाठोपाठ आता स्वित्झर्लंडमध्येही बुरखाबंदी लागू करण्यात येणार आहे. बुरखाबंदीच्या बाजूने मतदान झाल्यानं हा निर्णय लागू करण्यात आला आहे. स्वित्झर्लंडमध्ये गेल्या काही महिन्यात अनेक हिंसक आंदोलनं झाली. या हिंसक आंदोलकांनी तोंडावर बुरखा किंवा नकाब घातले होते.
त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी बुरखा किंवा नकाब घालण्यास बंदी करणारा प्रस्ताव स्वित्झर्लंडच्या संसदेने तयार केला. गेल्या रविवारी त्यावर जनमत घेण्यात आलं. तेव्हा 51 टक्के नागरिकांनी बुरखाबंदीच्या बाजूने मतदान केलं. आता लवकरच स्वित्झर्लंडमध्ये बुरखाबंदीचा कायदा केला जाणार आहे.
स्वित्झर्लंडची लोकसंख्या साधारण 86 लाख आहे. यातील 5.2 टक्के लोक मुस्लिम आहेत. सुमारे 30 टक्के महिला हिजाब किंवा नकाब घालतात. मात्र नव्या निर्णयानुसार, आता महिलांना सार्वजनिक ठिकाणी आपला चेहरा पूर्णपणे झाकता येणार नाही. स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या निर्णयानुसार संपूर्ण चेहरा झाकणं बेकायदेशीर असणार आहे.
असं असलं तरी धार्मिक स्थळांमध्ये मात्र ही बुरखाबंदी लागू नसेल. आजार रोखण्यासाठी तसंच सुरक्षिततेच्या कारणास्तव बुरखा वापरता येईल.
पण ही बुरखाबंदी इस्लाम धर्माविरोधी असल्याचं सांगत अनेक इस्लामी संघटनांनी या निर्णयाचा कडाडून विरोध केलाय. “जनमत चाचणी घेण्याची ही योग्य वेळ आहे, असे मला वाटत नाही. जाणीवपूर्वक समस्या निर्माण करून बुरखाबंदी लागू केली जातेय”, असं मत बुरखाबंदी विरोधक स्टेफनी अनसरमेट यांनी व्यक्त केलं आहे.
सॅम्युअल पैटी नावाच्या फ्रान्समधील शिक्षकाची एका इस्लामी दहशतवाद्यानं निर्घृण हत्या केली. या हत्येनंतर फ्रान्सनं इस्लामी कट्टरवादाविरोधात युद्ध पुकारले आहे. फ्रान्ससह युरोपातील अनेक देशांनी बुरखाबंदीचा कायदा केला. आता तशीच मागणी भारतातही होऊ लागलीय.
इस्लामी दहशतवाद्यांच्या जिहादी कारवाया रोखण्यासाठी बुरखाबंदी लागू केली पाहिजे, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. तर दुसरीकडे या मागणीला विरोधही होतोय.
युरोपात हिंसाचारी घटना रोखण्यासाठी बुरखाबंदीचा पर्याय पुढे आला आहे. मात्र भारतात तो लागू होईल का, याबाबत साशंकताच आहे.