तालिबानची पहिली पत्रकार परिषद, जगासमोर केली ही मोठी मागणी
अफगानिस्तान ताब्यात आल्यानंतर तालिबानने पहिली पत्रकार परिषद घेतली. यामध्ये तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिदी यांनी काही मागण्या केल्या आहेत.
काबुल : अफगानिस्तान ताब्यात आल्यानंतर तालिबानने पहिली पत्रकार परिषद घेतली. यामध्ये तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिदी यांनी आश्वासन दिले आहे की, 'ते कोणत्याही आंतरराष्ट्रीय दूतावास किंवा संस्थेला हानी पोहोचवणार नाहीत. तालिबान सरकारला आंतरराष्ट्रीय समुदायाने मान्यता दिली पाहिजे.'
प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिदी म्हणाले की, 'तालिबानने पूर्वी त्याच्याशी लढलेल्यांना माफ केले होते. जबीहुल्ला मुजाहिदी यांनी लोकांना सुरक्षेचे आश्वासन दिले आहे. ते म्हणाले की तालिबान कोणावरही सूड घेणार नाही. तालिबानने म्हटले की, आम्ही शेजारील देशांना आश्वासन देतो की आमची माती चुकीच्या कामासाठी वापरली जाणार नाही. आम्हाला आशा आहे की आंतरराष्ट्रीय समुदाय आम्हाला ओळखेल.'
तालिबानच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, 'महिलांना शाळा आणि रुग्णालयांमध्ये काम करण्याची परवानगी असेल. मुजाहिदी म्हणाले की, इस्लामनुसार महिलांना अधिकार मिळतील आणि त्यांच्यासोबत कोणताही भेदभाव केला जाणार नाही. प्रवक्त्यांनी सांगितले की, अफगाणांना त्यांच्या नागरिकांसाठी त्यांच्या मूल्यांनुसार योग्य असे नियम बनवण्याचे स्वातंत्र्य आहे. अशा परिस्थितीत इतर देशांनी त्यांचा आदर केला पाहिजे.'
जबीहुल्ला मुजाहिदी म्हणाले, 'आम्हाला काबूलमध्ये चेंगराचेंगरीचे वातावरण नको होते. त्यामुळे ते काबूलच्या बाहेर राहिले. मग हिंसेशिवाय सत्ताबदल झाला. आधीचे सरकार अक्षम होते. ते सुरक्षा देऊ शकत नव्हते. आम्ही सर्व परदेशी संस्थांना सुरक्षा देऊ, आम्हाला अफगाणिस्तानच्या बाहेर किंवा आत शत्रू बनवायचे नाहीत.'