तेहराण : इराणची (Iran) राजधानी तेहरानमध्ये युक्रेनच्या प्रवासी विमानाला अपघात झालाय. बोईंग ७३७ (Boeing 737) या विमानात क्रू मेम्बरसहीत १८० प्रवासी होते. या अपघातात १६७ जणांचा जागीच मृत्यू झाल्याचं समजतंय. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. हे युक्रेन इंटरनॅशनल एअरलाइन्सचं विमान होतं. इराणच्या इमाम खुमैनी विमानतळाजवळ या विमानाला अपघात झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, तेहरान इंटरनॅशनल विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच हे विमान कोसळलं. उल्लेखनीय म्हणजे, अमेरिकेन स्ट्राईकमध्ये इराणी जनरल कासिम सुलेमानी यांच्या हत्येनंतर सुडाच्या कारवाईत इराणद्वारे इराकमधील अमेरिकन सैन्याची २ ठिकाणं बॅलेस्टिक मिसाईलद्वारे उद्ध्वस्त करण्यात आली. त्यानंतर हा विमान अपघात झालाय.


इराणच्या न्यूक्लिअर पॉवर प्लान्टजवळ भूकंपाचा धक्का


 


भूकंपाचं ठिकाण

धक्कादायक म्हणजे, इरानमध्ये झालेल्या या अपघातापूर्वी भूकंपाचे धक्के बसल्याचं समजतंय. भूकंपाची तीव्रता ४.९ रिश्टर स्केल होती. बुशेहरजवळील अणुऊर्जा प्रकल्पाच्या (nuclear power plant) नजिक हे भूकंपाचे धक्के बसल्याचं समजतंय. यूनायटेड स्टेट जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार भूकंपाचा केंद्रबिंदू बोरजजानचा दक्षिण पूर्ण क्षेत्र होतं. या भूकंपानंतर काही मिनिटांतच तेहरान आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ युक्रेनचं विमान कोसळलं. जगातील अनेक पत्रकार विमान अपघात आणि भूकंपाच्या घटनेला अमेरिका-इराण दरम्यान सुरु असलेल्या संघर्षाला जोडून पाहत आहेत. 


दरम्यान, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून इराक जाणाऱ्या प्रवाशांसाठी सावधानतेचा इशारा जारी करण्यात आलाय. यामध्ये, नागरिकांना इराक प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आलाय.