अमेरिकेतील सर्वात मोठं राज्य टेक्सासमध्ये आता मास्क घालणं सक्तीचं नसणार आहे. कोरोना नियंत्रणात येतोय, तसंच लसीकरणही वेगानं सुरू आहे, असं मानत टेक्सासचे गव्हर्नर म्हणजेच तिथल्या मुख्यमंत्र्यांनी मास्क घातला नाही तरी चालणार असं सांगितलंय. मात्र ज्यांना मास्क घालण्याची इच्छा आहे, ते घालू शकतात, असंही त्यांनी म्हटलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग एबॉट यांनी मंगळवारी ही घोषणा केली आहे. जगात अमेरिकेमध्ये कोरोनाचा सर्वाधिक कहर पाहायला मिळालेला. यात टेक्सास हे असं राज्य आहे, जिथे ४२ हजाराहून अधिक लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावलाय. मात्र आता तिथे काही प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचं दिसू लागलंय.


खरतर टेक्सासमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टीही होतेय. अशात कोरोना आणखी फोफावण्याची शक्यता तज्ज्ञ मंडळी वर्तवतायत. टेक्सासमधील विरोधकांनी हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे. डेमोक्रेटिक पक्षाच्या सदस्यांचं मानणं आहे, की हा आदेश रद्द करावा, कोरोना पूर्णपणे नियंत्रणात येण्यासाठी मास्क बंधनकारक असणं गरजेचं आहे.


अमेरिकेत आतापर्यंत २ कोटी ९३ लाखाहून अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे, ज्यामध्ये तब्बल ५ लाख लोकांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.