मुंबई : आयुष्याच्या एका वळणावर सुरेख असा थांबा येतो आणि खऱ्या अर्थाने हा थांबा बऱ्याच गोष्टी बदलून जातो. हा एक असा बदल असतो, ज्यासाठी बरेचजण घाबरतात, त्यापासून दूर पळतात पण, सरतेशेवटी त्याला आपलंसं करतात. असा हा थांबा म्हणजे लग्नाचा. जीवनात येणारा हा दिवस अतिशय खास असतो आणि तोच आणखी खास करावा यासाठीच प्रत्येकजण प्रयत्नशील असतो. मग सुरुवात होते ती बेत आखण्याची, हा सोहळा कसा रंगतदार करता येईल यासाठीच्या तयारीची आणि त्यासाठी लागणाऱ्या खर्चाची जुळवाजुळव करण्याची. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नसोहळ्यासाठी होणारा खर्च हा भल्याभल्यांना घाम फोडून जातो. 'राव... खूप खर्च झाला', असं म्हणत अक्षरश: डोक्याला हात लावणारी मंडळीही काही कमी नाहीत. हाच ताण दूर झाला तर? उंचावल्या ना भुवया? लग्नाचा खर्च तोही परवडणारा... कितीही प्रयत्न केले तरी खर्चाचे आकडे हे वरखाली होतातच. पण, एक मित्र हाच खर्च कसा कमी करायचा याचं तंत्रच सर्वांना सांगत आहे, तेही स्वानुभवाने.  


सोशल मीडियावर एक मित्र त्याच्या लग्नसोहळ्याचा बेत सर्वांसाठी घेऊन आला आहे. मुख्य म्हणजे अवघ्या २० हजार रुपयांमध्ये त्याने कशा प्रकारे स्वत:चा विवाहसोहळा पार पाडला याविषयीची संपूर्ण माहिती देत 'अपनी मर्जी की शादी' हा नवा ट्रेंडच जणू सुरु केला आहे. 


ट्विटरच्या माध्यमातून रिझवान या पाकिस्तानी युवकाने त्याच्या या छोटेखानी आणि तितक्याच सुरेख अशा विवाहसोहळ्याचा बेत नेमका कसा आखला याविषयीची माहिती दिली आहे. 


'लग्नसराईचे वारे सध्या सर्वत्र वाहत आहेत, तेव्हा ही आहे माझ्या लग्नाची गोष्ट...जी वाचून आपल्या मर्जीने लग्नसोहळ्याचं आयोजन करणं सहज शक्य असतं यावर तुमचाही विश्वास बसेल....', असं लिहित त्याने आपल्या अनोख्या आणि खिशाला परवडेल अशा लग्नसोहळ्याची माहिती दिली. 



अवघ्या २५ पाहुण्यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडला, जो रिझवानच्याच घराच्या गच्चीवर आयोजित करण्यात आला होता. लग्न म्हटलं की त्यात मेजवानी ही आलीच. रिझवानच्या लग्नातही मेजवानीची लज्जत होती. चिकन टिेक्का, सीख कबाब, छोले भटुरे, हलवा, आईस्क्रिम आणि स्ट्रॉबेरी असे चवीष्ट पदार्थ या मेजवानीत होते. 



लग्नासाठी अमुक इतका खर्च करायचा असंच त्याने ठरवलं होतं. ज्यात त्याला मदत झाली ती म्हणजे कुटुंबीयांची आणि मित्रपरिवाराची. कोणी मेजवानी तयार करण्यासाठी मदत केली, तर कोणी सजावटीसाठी. इथे शेजाऱ्यांनीही रिझवानच्या या खास विवाहसोहळ्यात मदत केली आणि पार पडली रिझवानची, 'अपनी मर्जी की शादी'. 


पंचतारांकित हॉटेल, महागडे कपडे, मेजवानी, पाहुण्यांची गर्दी या साऱ्या साचेबद्ध गोष्टी बाजूला सारत स्वत:च्या आयुष्यातील हा दिवस स्वत:ला हवा त्याच अंदाजात पार पाडत तो संस्मरणीय करणाऱ्या रिझवानला सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनीच शुभेच्छा दिल्या असून त्याच्या या अफलातून आखणीसाठी प्रशंसाही केली आहे. काय मग तुम्हाला कशी वाटली त्याची ही, 'अपनी मर्जी की शादी?'