`या` तारखेला पृथ्वीजवळून जाणार हिरव्या रंगाचा धूमकेतू; आता पाहिला नाही तर 400 वर्ष वाट पाहावी लागेल
1986 मध्ये शेवटचा धूमकेतू दिसला होता. पृथ्वीवरून दिसलेला शेवटचा धूमकेतू हॅलीचा धूमकेतू होता. आता 2023 मध्ये धूमकेतू दिसत आहे. यानंतर आता थेट 400 वर्षांनी पुन्हा धुमकेतू दिसणार आहे.
Green Comet: ब्रम्हांड हे अनेक रहस्यांनी भरलेले आहे. आकाशगंगा, ग्रह, तारे अशा याबाबत रोज नव नविन माहिती समोर येत असते. यासह उल्कावर्षाव, धूमकेतू सारखे अवकाशात घडणाऱ्या खगोलीय घटना या खगोलप्रेमींसाठी मोठी पर्वणी असतात. अशीच एक खगोलीय घटना 17 सप्टेंबर 2023 रोजी घडणार आहे. यादिवशी पृथ्वीजवळून हिरव्या रंगाचा धूमकेतू जाणार आहे. उघड्या डोळ्यांनी आपण हा हिरव्या रंगाचा धूमकेतू पाहू शकतो. आता पाहिला नाही तर हा धूमकेतू पुन्हा पाहण्यासाठी 400 वर्ष वाट पाहावी लागेल.
पृथ्वीच्या जवळ आलाय हिरव्या रंगाचा निशिमुरा धूमकेतू
या हिरव्या रंगाच्या धूमकेतूला 'निशिमुरा धूमकेतू' असे नाव देण्यात आले आहे. 12 सप्टेंबर रोजी निशिमुरा धूमकेतू पृथ्वीच्या जवळ आला आहे. 17 सप्टेंबर रोजी हा निशिमुरा धूमकेतू पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहे. अमेरिकन अंतराळ संस्था नासा देखील या धूमकेतूच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे.
जपानी खगोलशास्त्रज्ञाने शोधला निशिमुरा धूमकेतू
जपानी खगोलशास्त्रज्ञ हिदेओ निशिमुरा यांनी हा धूमकेतू शोधला होता. यामुळेच या धूमकेतूला निशिमुरा धूमकेतू असे नाव देण्यात आले आहे. या धूमकेतूला वैज्ञानिक भाषेत C/2023 P1 असे संबोधण्यात आले आहे. हा धूमकेतू नेपच्यूनच्या कक्षेबाहेर आहे.
धूमकेतू म्हणजे काय?
धूमकेतू हा धूळ, बर्फ आणि वायूच्या मिश्रणाने बनलेला सौर यंत्रणेतील एक दगड आहे. इतर ग्रहाप्रमाणे धूमकेतू देखील सूर्यांना प्रदक्षिणा घालतो. धूमकेतूची कक्षा बाह्य सौरमालेत असे. नासाच्या मते या धूमकेतुला सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास सुमारे 430 वर्षे लागतात. यावेळीच या धूमकेतूचे दर्शन होते. हा धूमकेतू ग्रहाच्या 78 दशलक्ष मैल किंवा 125 दशलक्ष किलोमीटरच्या आत जाईल. धूमकेतूचा सूर्याच्या सर्वात जवळचा बिंदू 17 सप्टेंबर रोजी दिसणार आहे. यानंतर हा धूमकेतू पृथ्वीपासून 20.5 दशलक्ष मैल किंवा 33 दशलक्ष किमी अंतरावर जाईल. निशिमुरा हा धूमकेतू सूर्यमालेतून प्रवास करताना अधिक उजळ दिसणार आहे. यानंतर तो लहान ताऱ्याच्या आकारापर्यंत जाईल.
उघड्या डोळ्यांनी पाहता येणार हा धूमेकेतू
या धूमकेतूमधून वाय उत्सर्जित होत असल्याने यातून अतिशय चमकदार असा हिरव्या रंगाचा प्रकाश दिसणार आहे. यामुळेच उघड्या डोळ्यांनी हा धूमेकेतू पाहता येणार आहे. धूमकेतू निशिमुरा ताशी 240,000 मैल वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत आहे. 17 सप्टेंबर रोजी हा धूमेकेतू सूर्याच्या अगदी जवळ असेल. या टप्प्यावर या धूमकेतूच्या प्रकाशाची तीव्रता 2.9 असेल यामुळेच हा धूमकेतू उघड्या डोळ्यांना पाहता येणार आहे. मध्यरात्री पहाटे 3 ते 4 च्या सुमारास या धुमकेतूचे दर्शन होणार आहे.