विमानातही असतो हॉर्न, कधी वापरतात ते जाणून घ्या
वाहतूक कोंडी सुटावी यासाठी गाडी चालक जोरजोरात हॉर्न मारतो. मात्र या हॉर्नमुळे समस्या सुटण्याऐवजी सर्वाधिक त्रासच होतो. कधी कधी तर असं वाटतं की विमानातून प्रवास केलेला बरा.
मुंबई: रस्त्यावरून चालताना किंवा गाडीवरून प्रवास करताना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. अनेकदा वाहतूक कोंडी सुटावी यासाठी गाडी चालक जोरजोरात हॉर्न मारतो. मात्र या हॉर्नमुळे समस्या सुटण्याऐवजी सर्वाधिक त्रासच होतो. कर्णकर्कश आवाजामुळे त्या कोंडीतून कधी एकदा बाहेर जातो असं वाटतं. कधी कधी तर असं वाटतं की विमानातून प्रवास केलेला बरा. कर्णकर्कश हॉर्नच्या कटकटीपासून तरी सुटका होईल. पण खरंच विमानाचा प्रवाश आवाजाशिवाय होतो का? तर नाही. विमानालाही हॉर्न असतात हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. कारण विमान प्रवासातही अनेक अडचणी येतात. त्यामुळे विमानातही हॉर्नचा वापर केला जातो. पण हॉर्न नेमका कधी वाजवला जातो, याबाबत जाणून घ्या.
विमानात दिलेला हॉर्न ग्राउंड इंजिनीअर आणि कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्यासाठी आणि धोक्याची सूचना देण्यासाठी वापरला जातो. विमानात काही बिघाड झाल्यास किंवा उड्डाण करण्यापूर्वी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास, विमानात बसलेला पायलट किंवा अभियंता हा हॉर्न वाजवून ग्राउंड इंजिनीअरला अलर्ट संदेश पाठवतो.
या हॉर्नचे बटण विमानाच्या कॉकपिटवर असते. हे कॉकपिट कंट्रोल्समधील इतर बटणांसारखेच असते, त्यामुळे ते शोधणे कठीण आहे. या बटणाच्या वर 'GND' (ग्राउंड) लिहिलेले आहे. हे बटण दाबल्यावर विमानातील अलर्ट सिस्टम सुरू होते आणि सायरनसारखा आवाज येतो. विमानातील हॉर्न लँडिंग गीअर कंपार्टमेंटमध्ये बसवले जाते.
विमानांमध्ये स्वयंचलित हॉर्न देखील असतात जे सिस्टममध्ये बिघाड किंवा आग लागल्यानंतर आपोआप आवाज करतात. विशेष म्हणजे या हॉर्नचा आवाजही वेगळा असतो. सिस्टीममधील दोषानुसार वेगवेगळ्या आवाजात वाजतो. याद्वारे विमान अभियंते जहाजाच्या कोणत्या भागात बिघाड झाला आहे हे शोधू शकतात.
वैमानिकाला हॉर्न वाजवण्याचेही काही नियम असतात. उड्डाण करण्यावेळी वैमानिक हॉर्न वाजवू शकत नाही. कारण त्या वेळेस वॉर्निंग सिस्टम बंद केलेली असते.