ब्युरो रिपोर्ट :  कोरोनामुळे जगभरात जवळजवळ सर्वच देशात सुरु असलेलं लॉकडाऊन आणि निर्बंध उठवण्यासाठी त्यात्या देशाची सरकारं प्रयत्नशील आहेत. ऑस्ट्रेलियातील निर्बंध उठवण्यासाठी पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी तीन टप्प्यांचा प्लान आखला आहे. तीन टप्प्यांत हळूहळू ऑस्ट्रेलियातील निर्बंध उठवले जाणार असून त्याचा वेळोवेळी आढावाही घेतला जाणार आहे. विशेष म्हणजे जुलैमध्ये तिसऱ्या टप्प्यात ऑस्ट्रेलियातील जनजीवन बऱ्यापैकी पूर्वपदावर आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. अनेक देशांत आता लॉकडाऊन शिथिल करण्यात येत असून भारतातही आता हळूहळू निर्बंध उठवण्याची तयारी करायला हवी, अशी मागणी होत आहे. 


पहिल्या टप्प्यात काय सुरु होणार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियात पहिल्या टप्प्यात रिटेल स्टोअर्स, कॅफे, रेस्टॉरंट्स सुरु करायला परवानगी दिली जाईल. ग्रँथालयं, कम्युनिटी सेंटर्स, खेळाची मैदानं खुली केली जातील. मात्र कोणत्याही व्यावसायिक ठिकाणी किंवा सार्वजनिक ठिकाणी एका वेळी केवळ १० व्यक्तिंनाच प्रवेश दिला जाईल. या टप्प्यात सलूनही सुरु होतील. नागरिकांना घरी भेटण्यासाठी लोक येऊ शकतील, पण एकावेळी ५ जणांचा प्रवेश दिला जाईल. पहिल्या टप्प्यात स्थानिक आणि प्रादेशिक वाहतुकीला परवानही दिली जाईल. कर्मचारी आणि कंपनी किंवा मालक यांना मान्य असेल तर वर्क फ्रॉम होम करू करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. लग्नात वधुवर आणि कुटुंबीयांव्यतिरिक्त १० पाहुण्यांना परवानगी असेल. अंत्यसंस्कारासाठी इनडोअर असेल तर २० आणि आऊटडोअर असेल तर ३० लोक उपस्थित राहू शकतील. धार्मिक कार्यक्रमात १० जण एकत्र येऊ शकतील.


दुसऱ्या टप्प्यात काय सुरु होईल?


दुसऱ्या टप्प्यात व्यावसायिक, सार्वजनिक ठिकाणी किंवा नागरिकांच्या घरी २० जणांना परवानगी दिली जाईल. दुसऱ्या टप्प्यात व्यायामशाळा, ब्युटी पार्लर, सिनेमागृहं, गॅलरी आणि मनोरंजन पार्क खुली करण्यास परवानगी देण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यात आंतरराज्य प्रवासालाही काही प्रमाणात मान्यता दिली जाईल. कर्मचारी आणि कंपनी, मालक यांना मान्य असेल तर दुसऱ्या टप्प्यातही वर्क फ्रॉम होम सुरु राहील.


तिसरा टप्पा कसा असेल?


तिसऱ्या टप्प्यात १०० जणांना एकत्र येण्याची परवानगी दिली जाईल. कामावर जाण्यासाठीही मान्यता दिली जाईल. नाईट क्लब, फूड कोर्ट सुरु करण्यात येतील. आंतरराज्य वाहतूक सुरु करण्यात येईल. परदेशी विद्यार्थ्यांना प्रवास करण्यास परवानगी देण्यात येईल.


कधीपासून सुरु होणार पहिला टप्पा?


काही राज्यात १५ मेपासून पहिला टप्पा सुरु होणार आहे. तर काही राज्यात १८ मेपासून सुरु होईल. प्रत्येक राज्य आपलं वेळापत्रक ठरवणार आहे. पहिला आणि दुसरा टप्पा साधारण सारखाच आहे, फक्त त्यात लोक एकत्र येण्याची संख्या दुप्पट करण्यात येणार आहे. प्रत्येक टप्प्यात अर्थव्यवस्थेला किती चालना मिळेल आणि किती रोजगार सुरु होतील याचाही विचार केला आहे.


 



या तीनही टप्प्यांत वेळोवेळी आढावा घेण्यात येणार आहे आणि जुलैपर्यंत ऑस्ट्रेलियाला पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.