बाप रे! लाईटहाऊसच्या देखभालीसाठी लाखो डॉलर पगार
सन फ्रान्सिस्को सभोवतालच्या पाण्यातून खलाशांना दिशादर्शन व्हावे, यासाठी या प्रकाशगृहाची निर्मिती करण्यात आली होती.
वॉशिंग्टन - अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये येणाऱ्या एका बेटावरील ऐतिहासिक प्रकाशगृहाची देखभाल करण्यासाठी तब्बल एक लाख ३० हजार डॉलर इतके भलामोठे वेतन देण्याची ऑफर देण्यात आली आहे. दोघांनी मिळून या प्रकाशगृहाची पाहणी करायची असून, वेतन दोघांमध्ये वाटून दिले जाईल, असे जाहीर करण्यात आले आहे. सॅन फ्रान्सिस्को खाडीचाच हा एक भाग आहे. सीएनएनवर या संदर्भातील वृत्त प्रसारित करण्यात आले आहे. सन १८७४ मध्ये या प्रकाशगृहाची निर्मिती करण्यात आली. सन फ्रान्सिस्को सभोवतालच्या पाण्यातून खलाशांना दिशादर्शन व्हावे, यासाठी या प्रकाशगृहाची निर्मिती करण्यात आली होती. १९६० मध्ये हे प्रकाशगृह पूर्णपणे यांत्रिक पद्धतीने चालविण्यास सुरुवात करण्यात आली. अमेरिकी तटरक्षक दलाकडे या प्रकाशगृहाची मालकी असून, ना नफा ना तोटा तत्त्वावर ते 'द ईस्ट ब्रदर लाईट हाऊस' कंपनीकडून चालवले जाते.
१९७९ पासून ते पश्चिम किनाऱ्यावरील विश्रांती आणि नाश्त्याचे मुख्य स्थान होते. मी जवळपास ४० वर्षे या ठिकाणी काम करतो आहे. काही वर्षांपूर्वी प्रकाशगृहाचे नुकसान झाले होते. त्यावेळी त्याची आम्ही डागडुजी केली होती. नंतर हे प्रकाशगृह सांभाळण्यासाठी महसूल गोळा करण्याचे काही मार्ग आम्ही शोधले., असे कॅलिफोर्नियाचे महापौर टॉम बट यांनी सांगितले. बट यांच्या कंपनीकडूनच या प्रकाशगृहाची देखभाल केली जाते. ही जागा अतिशय हटके आहे. त्याचबरोबर बेटावरील प्रकाशगृहामध्ये विश्रांती आणि नाश्त्याची सोय असलेले हे एकमेव ठिकाण आहे.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आदरातिथ्य क्षेत्रातील कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर त्याच्याकडे अमेरिकी तटरक्षक दलाचा व्यावसायिक बोटी चालवण्याचा परवानाही हवा, असे कंपनीच्या वेबसाईटवर म्हटले आहे.