हीच नोकरी पाहिजे आपल्याला...; अडीच लाखांचा पगारासह एकाहून एक सरस सुविधा, ही Job Offer पाहिली?
Recruitment News : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी बातमी. कारण, तुमचा विश्वास बसणार नाही पण इथं एका नोकरीसाठी चक्क अडीच लाख रुपये इतका पगार मिळतोय.
Job News : सहसा नोकरीचा विषय निघतो तेव्हा सरकारी नोकरीवर जोर देऊन बोलणारे अनेक असतात. कारण, हा विषयच तसा असतो. सरकारच्या अख्त्यारित येणाऱ्या विभागांमध्ये काम करण्यासाठी मिळणारा पगार, सुविधा आणि इतर गोष्टींसाठी अनेकांचाच कल या सरकारी नोकरीकडे असतो. जीवनात बहुविध क्षेत्रांमध्ये काम करून आलेल्यांनाही या सरकारी नोकरीचा हेवा वाटतो. 'तुमचं काय बाबा, तुमच्याकडे सरकारी नोकरी आणि पगारही आहे', असं म्हणत आपण एखाद्या व्यक्तीची फिरकीही घेतली आहे. पण, याहूनही एक कमाल नोकरी सध्या नजरा वळवत आहे.
दणक्यात पगार (salary news) आणि सुविधा असणाऱ्या या नोकरीची जाहिरात सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधत असून बऱ्याच नेटकऱ्यांनी आम्हाला अशीच नोकरी पाहिजे, अशी इच्छाही व्यक्त केली आहे. काय म्हणता? पगार किती? अहो पगार इतका की ऐकून डोळे चक्रावतील.
नोकरीच्या जाहीरातीवर नेटकऱ्यांची झुंबड
हल्लीच सिंगापूरमध्ये एका मोठ्या रेस्तराँनं त्यांच्या इथं असणाऱ्या एका पदासाठीची जाहिरात जारी केली. बस्स, मग काय? इंटरनेटवर याच नोकरीच्या जाहिरातीनं सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत. एका सोशल मीडिया अकाऊंटवरून ही जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे, जिथं अजुम्माच्या कोरियन रोस्तराँमध्ये किचन स्टाफ आणि सर्विस स्टाफ या पदांसाठी नोकरभरती सुरु आहे.
पगारपण पाहूनच घ्या...
रेस्तराँमध्ये काम करण्यासाठी कंत्राटी स्वरुपातील कर्मचाऱ्यांना ताशी $10-$15 (800 रुपये ते 1300 रुपये) इतकं वेतन दिलं जाणार आहे. तर, पूर्णवेळ कर्मचाऱ्यांना इथं महिन्याला $2750-$3300 (2.27 लाख ते 2.72 लाख रुपये) इतका पगार दिला जाणार आहे. गडगंड पगारच नव्हे, तर कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ, सुट्ट्या, वैद्यकिय सुविधा, वैद्यकिय चाचणी, वर्षातून दोनदा मिळणारा बोनस, मासिक रेवेन्यू इंसेंटिव बोनस, अॅडीशनल इंश्योरेंस कवरेज, रेफरल बोनस, मील प्रोवीजन अशा सुविधांचाही समावेश आहे.
हेसुद्धा वाचा : रेल्वे स्टेशन, हॉटेलमध्ये Free Wi Fi वापरणं धोक्याचं; टाळा ' या ' चुका
लाखामोलाच्या या नोकरीची जाहीरात नेटकऱ्यांनी पाहिली आणि अशीच एखादी नोकरी मिळते का, यासाठीचे प्रयत्नही सुरु केले. काहींनी तर, मला अशीच नोकरी पाहिजे असं म्हणत इथं नोकरी करण्याची इच्छाही व्यक्त केली. पण, काही जाणकार नेटकऱ्यांनी मात्र येथील वस्तुस्थिती सर्वांपुढे मांडली. 'सिंगापूरसारख्या ठिकाणी नोकरीच्या दर 10 जागांसाठी फक्त 8 अर्ज केले जातात. भारतात मात्र अनेकदा बराच युवा वर्ग सुरुवातीचे काही दिवस मोफत नोकरी करण्यासाठीही तयार असतो'. सिंगापूरची वस्तुस्थिती, तेथील राहणीमान या साऱ्याचा विचार करता तिथं दिला जाणारा हा पगार फार जास्त नाही असंच अनेकांचं मत. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये सांगा.