Afganistan मधील महिलांचा Viral Video पाहून नेटकरी म्हणतात, आता या हसऱ्या चेहऱ्यांचं काय होणार?
महिलांवर आता पुढच्या काळात काय परिस्थिती ओढावेल याचा विचारही करणं कठीण होत आहे.
नवी दिल्ली : अफगाणिस्तानमधून (Afganistan) अमेरिकेच्या (America) सैन्यानं काढता पाय घेतला आणि तालिबाननं इथं हातपाय परसण्यास सुरुवात केली. आता राजधानी काबुलही (Kabul) ताब्यात घेतल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं (Taliban) वर्चस्व साऱ्या जगाला धक्का देत आहे. अफगाणिस्तानच्या सैन्यानं तालिबानपुढे हात टेकल्यानंतर आता अनेक व्हिडीओ व्हायरल होऊ लागल्या आहेत. यामध्ये काही महिलांच्या व्हिडीओमुळं नेटकऱ्यांचं मन हेलावलं जात आहे.
2019 या वर्षातील हा व्हिडीओ पाहता, त्यामध्ये दिसणाऱ्या, हसणाऱ्य़ा महिलांवर आता पुढच्या काळात काय परिस्थिती ओढावेल याचा विचारही करणं कठीण होत आहे. यामध्ये बसमध्ये बसणाऱ्या महिला आनंदात गाणी गाताना दिसत आहेत. @AlinejadMasih नावाच्या एका युजरनं हा व्हिडीओ शेअर केला आहे.
भारत-पाकिस्तान संबंधांवर तालिबानची पहिल्यांदाच सावध प्रतिक्रिया
'हा अतिशय हृदयद्रावक व्हिडीओ आहे. जिथं इथल्या एकमेव महिला बँड पथकातील महिला आशावादी गीत गाताना दिसत आहेत. आता मात्र तिथं तालिबाननं ताबा मिळवल्यामुळं या महिलांना गाताही येणार नाही, आता त्यांना घरातच डांबून रहावं लागेल', असं या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर होताच अनेकांनी तेथील महिलांच्या परिस्थितीबाबत आणि भविष्यातील विदारक वास्तवाबद्दल चिंता व्यक्त करण्यास सुरुवात केली. #AfghanWomen हा हॅशटॅगही ट्विटरवर ट्रेंड करत असून, लोकांनी अफगाणिस्तानातील महिलांच्या वेदनांना वाचा फोडली आहे.