कोरोना व्हायरसमुळे अमेरिकेत एवढ्या मोठ्या प्रमाणात बळी जाणार
अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा अंदाज
ब्युरो रिपोर्ट : अमेरिकेत कोरोनाचे संकट दिवसेदिवस अधिकच वाढत आहे. अमेरिकेतील मृतांची संख्या आताच ६८ हजाराच्या वर गेली आहे. तर ११ लाख ८० हजारांवर कोरोनाचे रुग्ण आहेत. अमेरिकेतील कोरोनाचा हा कहर एवढ्यावरच थांबेल असे वाटत नाही. कोरोनामुळे एक लाखापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू होईल, असा अंदाज खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे.
अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये १८ हजारांवर मृत्यू झाले आहेत. गेले काही दिवस अमेरिकेत रोज हजारांवर बळी जात आहेत. तर न्यूजर्सीमध्ये साडेसात हजारावर बळी जात आहेत.
कोरोनाच्या संकटाने महासत्ता अमेरिकेलाही हादरवलं असताना दुसरीकडे कोरोनावरील औषध लवकरात लवकर तयार करण्याचा प्रयत्न सुरु आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत कोरोनावरची लस तयार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कोरोनाची लस पहिल्यांदा अमेरिकेत तयार होईल किंवा अन्य देशात. त्याची आपल्याला पर्वा नाही. अमेरिकेला मागे टाकून अन्य कोणत्याही देशाने कोरोनावरील लस बनवली तरी मला आनंदच होईल, असं ट्रम्प म्हणाले. कोरोनावर मात करेल अशी लस उपलब्ध व्हावी, एवढाच आपला हेतू आहे, असं ट्रम्प म्हणाले.
अमेरिकेतील शाळा, कॉलेज, विद्यापीठं सप्टेंबरमध्ये सुरु होतील असं ट्रम्प म्हणाले.
कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी जाहीर केलेले ३ ट्रिलियन डॉलर्सचं पॅकेज ६ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत वाढवण्याचा विचार त्यांनी बोलून दाखवला.
चीनने भीषण चूक केली आहे, असं सांगत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चीनवर पुन्हा एकदा आरोप केला. चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनीही कोरोना व्हायरस चीनच्या प्रयोगशाळेत तयार झाल्याचे पुरावे असल्याचे एक दिवस आधीच म्हटलं होतं. तर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनीही कोरोना विषाणूची निर्मिती आणि प्रसार याबाबत चीनवर अनेकदा आरोप केले आहेत.